जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही जनजागृती करण्यात येत आहे. याचे फलीत म्हणून पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा संजय महाले यांनी धान्य वाटप करण्यासाठी एक कल्पना अंमलात आणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अभिनव उपक्रम सर्वांसमोर ठेवला आहे.
सुरेखा महाले यांनी आपल्या दुकानात स्वस्त धान्य वाटप करण्यासाठी एक मोठे नरसाळे आणि स्वतंत्र पाईप ठेवला आहे. लाभार्थी दुकानात आल्यावर दुकानदार ई-पॉस मशिनद्वारे स्वत:चे आधार प्रमाणित करून लाभार्थ्यासमोर धान्य मोजतात. त्यानंतर लाभार्थ्याला पाईपच्या दुसऱ्या टोकाला पिशवी लावण्यास सांगितले जाते. लाभार्थींनी पाईपच्या दुसऱ्या टोकाला पिशवी लावल्यानंतर मोठ्या नरसाळ्यातून धान्य आपोआप लाभार्थीच्या पिशवीत पडते. यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’ होत असून लाभार्थ्यांना उभे राहण्यासाठी ५ फूट अंतरावर चौकोन तयार करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी रांगेत या चौकोनातच उभे राहण्याच्या सूचनाही महाले यांनी सर्वांना दिल्या आहेत.
हेही वाचा - COVID -19 : धारावीत आढळला तिसरा रुग्ण, डॉक्टरला कोरोनाची लागण..
देशभरात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. ही बाब लक्षात घेऊन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांना स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून धान्य वाटपाची सुविधा ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुरवठा विभागाला धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा -दिल्ली पोलिसांची सामाजिक बांधिलकी, लॉकडाऊनदरम्यान ७० गर्भवतींना पोहोचवले रुग्णालयात
जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी या निर्णयाची जिल्हाभर काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या. त्यानुसार सुरेखा महाले यांनी आपली, आपल्या कुटुंबाची आणि ग्राहकांची सुरक्षितता ओळखून हा पर्याय शोधला.
सुरेखा संजय महाले या पाचोरा शहरात गेल्या २० वर्षांपासून स्वस्त धान्य दुकान चालवत असून त्यांच्याकडे एकूण ४७० लाभार्थी आहेत. काही दिवस पिठाची गिरणी चालवली असल्याने, ही कल्पना सुचल्याचे महाले यांनी सांगितले.