जळगाव - पत्नीच्या उपचाराचा खर्च परवडत नसल्याने पतीने आपल्या गतिमंद मुलासह विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शहरातील आदर्शनगरात घडली. दीपक रतीलाल सोनार (वय 64) व परेश दीपक सोनार (वय 35) अशी मृत पिता-पुत्रांची नावे आहेत. या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरातील आदर्शनगरात दीपक सोनार हे पत्नी श्रद्धा, मुलगा परेश यांच्यासह राहत होते. दागिने पॉलिश करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सोनार यांच्या पत्नी चालवत होत्या. चार दिवसांपासून श्रद्धा सोनार यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. न्युमोनियाचे निदान झाल्याने चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाने चार दिवसांच्या उपचारासाठी दीड लाख रुपये बिल काढले. बिलाचे हे पैसे सोनार यांची मुलगी व जावयाने भरले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे पुन्हा त्यांच्या उपचारासाठी साधारण चार ते पाच लाख रुपये खर्च येईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. उपचाराचा खर्च पेलवणारा नसल्याने काय करावे? अशी चिंता दीपक सोनार यांना होती. याच विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे.
हेही वाचा - वझेंची एकाच दिवशी दुसऱ्यांदा बदली, नियंत्रण कक्षातून आता नागरी सुविधा केंद्रात
मुलगी जावई आले होते भेटायला -
श्रद्धा सोनार आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना भेटण्यासाठी काल नंदुरबार येथे राहणारी त्यांची मुलगी रुपाली व जावई रुपेश सोनार हे जळगावला आले होते. त्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. नंतर डॉक्टरांशीही चर्चा केली. आम्ही आता रुग्णालयाचा खर्च करू शकत नसल्याने श्रद्धा यांना सरकारी रुग्णालयात नेण्याबाबत डॉक्टरांचे मतदेखील त्यांनी जाणून घेतले होते. यानंतर मुलगी व जावई हे नंदुरबारला जाण्यापूर्वी दीपक सोनार यांना भेटण्यासाठी आदर्शनगरातील घरी गेले तेव्हा दीपक सोनार व परेश सोनार यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले.
हेही वाचा -
रामानंदनगर पोलीस ठाण्यात घटनेची झाली नोंद -
या घटनेप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पंचनामा करताना पोलिसांना घटनास्थळी कोणत्याही प्रकारची चिठ्ठी मिळून आलेली नाही. मात्र, पत्नीच्या उपचारासाठी होणारा खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने याच नैराश्यातून दीपक सोनार यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज त्यांच्या आप्तेष्टांनी वर्तवला आहे.