जळगाव - जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक किशोर पाटील-कुंझरकर यांच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात मद्याच्या नशेत तर्रर्र असलेल्या दोन तरुणांनी कुंझरकर यांना बेदम मारहाण केली होती. मारहाणीत डोक्यावर पडून गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वाल्मिक रामकृष्ण पाटील (वय ३२) व आबा भारत पाटील (वय २५, दोघे रा. सोनबर्डी, ता. एरंडोल) असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.
९ डिसेंबरला आढळला मृतदेह
कुंझरकर यांचा मृतदेह ९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता पळासदळ येथे आढळला होता. तत्पूर्वी पहाटे तीन वाजता कुंझरकर हे १५ मिनिटात परत येतो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर सकाळी ८ वाजता पळासदळे शिवारात त्यांचा मृतदेह आढळला होता.
असा आहे घटनाक्रम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पहाटे ३.३० वाजता कुंझरकर हे पायीच चालत एरंडोल शहरातील धरणगाव चौफुली परिसरात आले. त्यांना धुळे येथे मित्राकडे व तेथून सुरतला जायचे होते. दरम्यान, थंडी वाजत असल्याने कुंझरकर हे रस्त्याच्या कडेला एका शेकोटीवर बसले. याचवेळी वाल्मीक व आबा हे दोघे दुचाकीने तेथे आले. हे दोघे एरंडोल तालुक्यातील अंजनविहिरे येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेलेले होते. दोघे मद्याच्या नशेत तर्रर्र होते. यावेळी गप्पा मारत असताना कुंझरकर यांनी वाल्मीक व आबा यांना दारु पिण्यावरुन हटकले. याचा राग आल्यामुळे दोघांनी कुंझरकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत डोक्यावर पडल्यामुळे कुंझरकर अर्धमेले झाले होते. तशाच अवस्थेत दोघांनी त्यांना दुचाकीवर बसवून पळासदळे शिवारात नेऊन टाकले. यानंतर वाल्मीक व आबा यांनी कुंझरकरांचे पाकीट, मोबाईल काढून घेत दुचाकीने घटनास्थळावरुन पळ काढला. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे कुंझरकर यांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी ८ वाजता उघडकीस आली होती.
सीसीटीव्ही फुटेजची तपासात मदत
या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहिल्या दिवसापासून एरंडोल शिवारात तपास सुरू केला होता. कुंझरकर यांना मारहाण होत असल्याची घटना हॉटेल एकविरा येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाली होती. हा सर्वात महत्त्वाचा धागा पोलिसांना मिळाला होता. त्या आधारे पोलिसांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची माहिती काढली. त्यातून वाल्मीक व आबा यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दुचाकी जप्त केली आहे.