जळगाव - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जळगाव जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत भाजप नेते गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे जळगाव जिल्ह्यासाठी 20 मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनचा एक टँकर उपलब्ध झाला. हा टँकर बुधवारी (दि. 5 मे) दुपारी गुजरात राज्यातून जळगावात दाखल झाला. त्यामुळे कोरोनाग्रस्तांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची आगामी 24 तासांची गरज भासली आहे. लिक्विड ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरू आहे. अशा परिस्थितीत दररोज हजारांच्या उंबरठ्यावर नवीन बाधित रुग्ण समोर येत आहेत. कोरोनाची दुसरी लाट तीव्र असल्याने रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेतली तर 24 तासांत सुमारे 40 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला दिवसाआड एक लिक्विड ऑक्सिजनचा टँकर मिळत आहे. यातून 24 तासांची गरज भासते. मात्र, सद्यस्थितीत लिक्विड ऑक्सिजनचा होणारा पुरवठा पुरेसा नाही. दररोज साधारणपणे 8 ते 10 मेट्रीक टन ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन भाजप नेते गिरीश महाजन यांनी जिल्ह्यासाठी 20 मेट्रीक टन क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजनचा टँकर उपलब्ध करून दिला आहे. गेल्या 8 दिवसांपासून ते या टँकरच्या उपलब्धतेसाठी प्रयत्नशील होते. अखेर बुधवारी (दि. 5 मे) दुपारी हा टँकर जळगावात दाखल झाला.
आठवड्यातून एक टँकर उपलब्ध करण्याचा प्रयत्न-
लिक्विड ऑक्सिजनचा टँकर जळगावात आल्यानंतर तो एमआयडीसीतील हर्षिता गॅसेस या रिफिलिंग सेंटरवर खाली करण्यात आला. सध्या जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य यंत्रणेसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज याठिकाणाहून भागवली जात आहे. दरम्यान, यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती विदारक आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आम्ही जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यासाठी आठवड्यातून एकदा 20 मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. हा लिक्विड ऑक्सिजन आम्ही प्रशासनाला विनामूल्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - जळगावात गरजूंसाठी 'शिवभोजन' योजना ठरली तारणहार