जळगाव - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गजभिये या जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कायमस्वरुपी अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारतील.
राज्याचे 'कोविड- 19'चे नोडल अधिकारी तथा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. जळगाव जिल्हा 17 एप्रिलपर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, महिनाभरात कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊन सद्य:स्थितीत रुग्णसंख्या चारशेच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. कोरोनाच्या नियंत्रणात अपयशी ठरल्याने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी डॉ. भास्कर खैरे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य समन्वय समितीच्या बैठकीत देखील डॉ. खैरेंच्या बाबतीत लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. याशिवाय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे देखील ते चर्चेत होते. अशा स्थितीत आरोग्य यंत्रणेचे प्रमुख म्हणून डॉ. भास्कर खैरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांच्यातील असमन्वय वारंवार समोर आला.
दोघांमधील कथित वादाचा मुद्दा जिल्हाधिकारी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत गेला होता. दोन्ही अधिकाऱ्यांमधील वादाबाबत अधिष्ठाता डॉ. खैरे यांच्याविरोधात तक्रारीही झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत राज्य शासनाला अहवाल दिला होता. आता कोरोना संसर्गाच्या वाढीचा ठपका ठेवत खैरेंची बदली करण्यात आली आहे.