जळगाव - लॉकडाऊनमुळे रखडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे गॅझेट सोमवारी प्रसिद्ध झाले. गेल्या चार दिवसांपासून बदल्यांच्या प्रस्तावांवर काम सुरू होते. यात जिल्हा पोलीस दलातील २४४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक फौजदार ते शिपाई या पदाच्या कर्मचाऱ्यांचे बदलीचे गॅझेट सोमवारी सकाळी प्रसिद्ध झाले. बदलीसाठी एकूण ९५६ जणांचे अर्ज आले होते. गेल्या चार दिवसांपासून बदली प्रक्रियेवर कामकाज सुरू होते. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या समितीने बदली अर्जांवर काम केले. यावेळी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तीन पर्यायांपैकी शक्य असेल अशा ठिकाणी बदली देण्यात आली.
या बदली प्रक्रियेमध्ये जागा वगळता इतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा पोलीस दलात आहे. त्यांच्या सूचना व शिफारशी विचारात घेण्यात आल्या असून, त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना नवीन नियुक्ती अथवा स्थगिती देण्यात आलेली आहे. एकंदरीतच काही कर्मचाऱ्यांच्या पसंतीनुसार किंवा नियमात नसतानाही बदली झाल्याचे बोलले जात आहे.