जळगाव - आठवड्याभरापासून बेपत्ता असलेल्या कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा मृतदेह आज कुजलेल्या अवस्थेत स्वच्छतागृहात आढळून आला होता. या घटनेमुळे कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. हे प्रकरण तापल्यानंतर रात्री उशीरा वॉर्ड क्रमांक सात मधील संबंधित डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी, वॉर्ड बॉय आणि वॉर्ड लेडी यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कोविड रुग्णालयातील विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील चंद्रकांत कळसकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. याच प्रकरणात दुपारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांसह वैद्यकीय अधीक्षक आणि पाच प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यानंतर वॉर्ड क्रमांक सातमधील संपूर्ण स्टाफवरही गुन्हा दाखल झाल्याने, कोविड रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
भुसावळ येथील एका ८२ वर्षीय महिलेला कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे जाणवत असल्याने सुरुवातीला भुसावळ येथील रेल्वेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिकच बिघडल्याने या महिलेला जळगाव येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले होते. याठिकाणी तिचा स्वॅब घेण्यात आला होता. स्वॅब पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार सुरू असताना ती अचानक बेपत्ता झाली होती. यासंदर्भात वृद्धेच्या नातवाने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी पोलीस तपास सुरू असतानाच बुधवारी सकाळी वृद्धेचा मृतदेह वॉर्ड क्रमांक सात मधील शौचालयात आढळल्याने खळबळ उडाली. वृद्धेवर उपचार सुरू असताना वॉर्ड क्रमांक 7 मधील डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय आणि वॉर्ड लेडी यांनी उपचाराकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणा केल्यानेच वृद्धेचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने सर्वांवर भादंवि कलम 304 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल करत आहेत.
हेही वाचा : बेपत्ता कोरोनाबाधित महिला मृत्यू प्रकरण; जळगाव मेडिकल कॉलेजच्या डीनसह 7 निलंबित