जळगाव - जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. आज रात्री पुन्हा 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 31 इतकी झाली आहे. दरम्यान, 31 रुग्णांपैकी 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात पहिल्यांदा एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णांपैकी 54 व्यक्तींचे तपासणी अहवाल आज रात्री जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 7 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर उर्वरित 47 संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित असलेल्या 7 रुग्णांपैकी 4 रुग्ण अमळनेरचे असून जळगाव, पाचोरा व भुसावळच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील आहेत. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 31 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाचे जिल्ह्यातील हॉट स्पॉट असलेल्या अमळनेर शहरात पुन्हा 4 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दुसरीकडे, भुसावळ, पाचोरा आणि जळगाव शहरात देखील नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या शहरांची चिंता वाढली आहे. जळगावात 26 दिवसांनंतर 2 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जळगावात 4 रुग्ण आढळले आहेत. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा कोरोनातून बरा होऊन घरी परत गेला आहे.