जळगाव - महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 'केळी संशोधन केंद्र' मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. या ठिकाणी पाच एकर क्षेत्रावर केळीच्या विविध वाणांवर संशोधन केले जाते. आतापर्यंत ९३ वाणांचे या ठिकाणी संकलन करण्यात आले आहे. यासह खते, कीटकनाशके याबाबतही संशोधन होत आहे.
शेतकऱ्यांना नवनवीन संशोधनाचा कसा फायदा होईल. आर्थिकदृष्ट्या शेतकरी कसा मजबूत होईल, याबाबत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येथे प्रयोग केले जातात. तसेच रोगांवरील उपायांबाबतही प्रयोगद्वारे माहिती संकलित केली जाते.
हेही वाचा... महिला दिन विशेष: 'वनांचा विश्वकोश' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी तुलसी गौडा यांची कहाणी
१९९१ पासून जळगावातील निमखेडी शिवारात सुरू असलेल्या केळी संशोधन केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रयोगशाळेची मागणी प्रलंबित आहे. हे संशोधन केंद्र वर्षानुवर्षे केवळ लागवड व काढणीपर्यंतच्या संशोधनापर्यंत मर्यादित राहिले आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांचीही वानवा असून केळीच्या आगारातच हे संशोधन केंद्र दुर्लक्षित असल्याने केळी उत्पादकांना दिलासा मिळणार कसा ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा... ...म्हणून वीर जीवा महालांच्या वारसांनी मानले 'ईटीव्ही भारत'चे आभार
साठ वर्षांपासून जिल्ह्यात संशोधन केंद्र...
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत हे केळी संशोधन केंद्र आहे. १९६१ मध्ये सावदा त्यानंतर १९६९ मध्ये यावल त्यानंतर अखेर १९९१ पासून जळगावात हे संशोधन केंद्र आहे. राज्यभरातील केळी लागवडीपैकी जळगावात जिल्ह्यातच ६० ते ७० टक्के लागवड होत असल्याने, या ठिकाणी हे केंद्र आहे.
अचानक कमी केले कर्मचारी...
उद्यान विद्यावेत्ता प्रा. एन. बी. शेख, कनिष्ठ मृदारसायन शास्त्रज्ञ प्रा. ए़. आर. मेढे, कनिष्ठ वनस्पती रोग निदान शास्त्रज्ञ यांच्यासह आर. आर. डोभाळ, एम. आर. देशमुख, व्ही. एस. लंगाटे हे कर्मचारी सध्या या संशोधन केंद्रात कार्यरत आहेत. २०१४ आधी या केंद्रात पुरेसे मनुष्यबळ होते. मात्र, अचानक एक दिवशी ई-मेलवर पत्र येऊन येथील कर्मचाऱ्यांना अन्य विभागांमध्ये हलवण्यात आल्याचे कळवण्यात आले. तेव्हापासून या ठिकाणी पाच ते सहा कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या केंद्रात मनुष्यबळाची मागणी होत आहे.