जळगाव - औरंगाबाद शहराच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः औरंगाबाद शहराचे नामकरण 'संभाजीनगर' झाले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. आजपर्यंत एकाही शिवसैनिकाच्या मुखातून या शहराचा उल्लेख औरंगाबाद असा येत नाही. तो संभाजीनगर असाच येतो. याप्रश्नी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून तोडगा काढतील, अशी भूमिका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मांडली.
ही काय शिवसेनेची आजची घोषणा नाही -
औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, ही पूर्वीपासून बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ही काय शिवसेनेची आजची घोषणा नाही. संभाजीनगर नाव देणे काही चुकीचे नाही. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील सांगितले आहे, असे ते म्हणाले.
फडणवीसांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये -
गुलाबराव पाटील यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेवरील टीकेचा समाचार घेतला. 'हिंदुत्त्व कुणाचे बदलले आहे, हे कोणाच्या सांगण्यावरून ठरत नाही. शिवसेनेचा जन्म हा हिंदुत्त्वापासून झाला आहे. शिवसेना जेव्हा राज्यात आली तेव्हा ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आली. त्यामुळे फडणवीसांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये. शिवसेनेच्या स्थापनेनंतर विलेपार्लेमधून जे आमदार निवडून आले, त्यांची निवडणूक फक्त हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर रद्द झाली होती, हे फडणवीसांनी विसरू नये', असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी फडणवीसांना लगावला.
हेही वाचा - पॉर्न फिल्म बघून शारीरिक संबंध ठेवताना गळफास लागून तरुणाचा मृत्यू