जळगाव - बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर भरधाव कंटेनरने कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळच्या सुमारास चोपडा शहराजवळ घडली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून कंटेनर देखील रस्त्यावर उलटला.
किशोर गजानन बिऱ्हाडे (वय ३५, रा. भाटपुरा, ता. शिरपूर), अनिल दशरथ जाधव (वय २२, रा. बभळाज, ता. शिरपूर) आणि नामदेव गुलाब कोळी (वय ३७, रा. मांजरोद, ता. शिरपूर) अशी अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. तर सागर नरेंद्र पाटील (वय १९, रा. अजनाड, ता. शिरपूर) हा अपघातात जखमी झाला आहे.
कारमधील चारही जण हे वाळूच्या ट्रॅक्टरवर चालक होते. रात्री ड्युटी करून ते चोपडाकडून घरी परतत होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर चोपडा शहरापासून काही अंतरावर काजीपुरा फाट्याजवळ शिरपूरकडून चोपडा शहराकडे येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात किशोर बिऱ्हाडे, अनिल जाधव आणि नामदेव कोळी हे जागीच ठार झाले तर सागर पाटील हा गंभीर जखमी झाला.
गंभीर बाब म्हणजे, कंटेनरचा वेग इतका होता की कारला धडक दिल्यानंतर कंटेनरने कारला तब्बल १० ते १२ मीटरपर्यंत ओढत नेले. त्यानंतर कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला. अपघाताची माहिती होताच चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात ठार झालेल्या तिघांचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.