जळगाव - गेल्या पंधरवड्यात सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने महापूर आला होता. या महापुराचा फटका तेथील जनजीवनाला बसला आहे. महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेती तसेच इतर सर्व प्रकारचे व्यवसाय वाहून गेले आहेत. आता तेथील नागरिकांसमोर जगावे कसे, हा मोठा प्रश्न आहे. अशा विपरीत परिस्थितीत, जीवनावश्यक वस्तूंची मदत करून तेथील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी हजारो हात पुढे आले आहेत.
जळगावातील अनेक सेवाभावी संस्था, संघटना, विविध राजकीय पक्ष, सार्वजनिक मित्र मंडळांकडून पूरग्रस्तांना सढळ हाताने शक्य ती मदत करण्याचे आवाहन केले जात आहे. जीवनावश्यक वस्तू तसेच आर्थिक मदत निधी गोळा करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी स्टॉल उभारण्यात आले आहेत. याठिकाणी संकलित होणारी सर्व प्रकारची मदत सांगली-कोल्हापूर मधील पूरग्रस्तांना पाठवली जाणार आहे.
पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतनिधी गोळा करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते शहरातील चौकाचौकात मदत पेट्या हातात घेऊन फिरत आहेत. या पेट्यांमध्ये प्रत्येक नागरिक आपल्या परीने शक्य ती मदत टाकत आहेत. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंच्या संकलनासाठी उभारलेल्या स्टॉलवर नागरिक कपडे, धान्य, स्वयंपाकासाठी लागणारी विविध प्रकारची सामग्री, टूथपेस्ट, साबण, सॅनिटरी पॅड, पाण्याच्या बाटल्या, गोळ्या व औषधी अशा प्रकारच्या वस्तू स्वेच्छेने आणून देत आहेत.
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्था व संघटनांनी केलेल्या जाहीर आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकंदरीतच 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ', या उक्तीचा प्रत्यय यानिमित्ताने येत आहे.