जळगाव - आजपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोविन ॲपमध्ये नाव नोंदणीसाठी खासगी रुग्णालयाचे कर्मचारी, काही ज्येष्ठांनी प्रयत्न केला असता, ॲप सुरूच झाले नाही. ॲप अपडेशनचे काम सुरु असल्याने जिल्ह्यातील ज्येष्ठांना आज कोरेाना लसीकरण होवू शकले नाही.
लसीकरण रखडले -
शहरासह जिल्ह्यातील 28 खासगी रुग्णालयात आज ज्येष्ठांचे लसीकरण करण्यात येणार होते. यामुळे खासगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक नाव नोंदणी व लसीकरणासाठी गेले असता, केंद्र शासनाच्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने त्यांची नाव नोंदणी होवू शकली नाही. अनेक ठिकाणी सर्व्हर सुरू नसल्याने लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील २८ खासगी रुग्णालयात लसीकरण -
शहरासह जिल्ह्यात २८ खासगी रुग्णालयात शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान जनआरोग्य योजना आदी योजनांद्वारे रुग्णांवर उपचार केले जातात. अशा रुग्णांना कोरोना लसीकरण सेंटरचा दर्जा देण्यात आला आहे. ज्येष्ठांना या रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस देण्यात येणार होती. त्यासाठी ज्येष्ठांना 150 रुपये व्हॅक्सिन शुल्क व 100 रुपये सर्व्हिस चार्ज, असे एकूण 250 रुपये मोजावे लागणार आहेत.
लसीकरण बंद ठेवण्याचे आदेश -
शहरातील ऑर्कीड हॉस्पीटल, गाजरे हॉस्पीटल, गोल्डसिटी हॉस्पीटल याठिकाणी कोरेाना लसीकरण सुरू होणार होते. ज्येष्ठांच्या नाव नोंदणीसाठी असलेल्या वेबसाइटच्या अपडेशनचे काम सूरू असल्याने शासनाने आज होणारे लसीकरण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ज्येष्ठांचे लसीकरण बंद आहे, अशी माहिती महापालिका रुग्णालयातील डॉ. पल्लवी पाटील यांनी दिली.
खासगी हॉस्पीटलमध्ये ‘ड्राय रन’ होणे बाकी -
४५ वर्षा पेक्षा जास्त वय असणारे आणि आजारी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आजपासून कोरोना लसीकरण करण्यात येणार होते. मात्र, त्याबाबतच्या सूचना अजून शासनाकडून आलेल्या नाही. सोबतच लसीकरणापूर्वी खासगी हॉस्पीटलमध्ये ‘ड्राय रन’ होणे बाकी आहे. शासनाकडून त्यासंदर्भातील सूचना आल्यास ड्राय रन घेतल्यानंतर खासगी रुग्णालयात लसीकरणाला सुरूवात होईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा रुग्णालयाचे प्रशासनाधिकारी डॉ. यू.बी. तासखेडकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वीच ब्रेक; सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी