जळगाव - बोदवड शहरातील चोरीच्या घटनांनी आता पुन्हा तोंड वर काढण्यास सुरुवात केली आहे. चार दिवसांपूर्वीच रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना चोरट्यांनी लाख रुपयांची कापूस चोरी करून जणू सलामीच दिली आहे. शहरातील जामनेर रस्त्यावर हायस्कूलसमोर असलेल्या अनिल अग्रवाल या नावाचे कापूस व धान्य खरेदी-विक्रीचे दुकान आहे. या दुकानाचे शटर ताेडून चाेरट्यांनी सुमारे २२ क्विंटल कापूस लंपास केला. या कापसाची किंमत एक लाख रुपये एवढी आहे. गेल्या दहा दिवसातील ही दुसरी घटना असून शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
शहरातील श्रीराम मंदिराजवळ राहणारे अनिल गुलाबचंद अग्रवाल (वय ५८ वर्षे) यांचे शहरात न. ह. रांका हायस्कूल समोर अनिल अग्रवाल या नावाचे कापूस व धान्य खरेदी-विक्रीचे दुकान आहे. अग्रवाल हे १५ नोव्हेंबरला संध्याकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. आज (दि. १६ नोव्हेंबर) सकाळी सव्वा आठ वाजता नेहमीप्रमाणे ते दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाचे शटर उघडे दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता दुकानातून सुमारे एक लाख रुपये किंमतीची २० ते २२ क्विंटल कपाशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे अनिल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुरट्या चोरांची टोळी सक्रिय
याच भागात काही दिवसांपूर्वी आकाश जैन यांच्या दुकानातून २२ हजारांची कपाशी व ज्वारी चोरट्यांनी शटर तोडून चोरून नेली होती. या घटनेला १० दिवसही उलटत नाहीत तोच पुन्हा याच ठिकाणाजवळ चोरी झाली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त हाेत असून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनांमुळे ऐन सणासुदीच्या काळात दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुरट्या चोरांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.