जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर शहरात अज्ञात चोरट्यांनी लुटीच्या उद्देशाने एका व्यापाऱ्यावर गोळीबार केला. परंतु, सुदैवाने चोरट्यांचा नेम चुकल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला. ही सिनेस्टाईल घटना सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अमळनेरातील न्यू प्लॉट भागातील नर्मदा वाडीजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर बितराई यांचे भाऊ तथा कैलास ट्रेडिंगचे संचालक बसंतालाल बितराई व त्यांचा मुलगा अजय बितराई यांच्यावर चोरट्यांनी लुटीच्या उद्देशाने गोळीबार केला. सुदैवाने दोघेही या घटनेतून बचावले आहेत. बसंतालाल बितराई आणि त्यांचा मुलगा अजय नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून घरी परतत होते. यावेळी न्यू प्लॉट भागातील नर्मदा वाडीजवळ लुटीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी बितराई पिता-पुत्राला अडवले. त्यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बितराई यांनी प्रतिकार केल्याने त्यांची चोरट्यांसोबत झटापट झाली. बिरताई पिशवी सोडत नसल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र, झटापटीदरम्यान चोरट्यांचा नेम चुकला आणि बिरताईंनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
हेही वाचा - एकाच वेळी निघाली 9 जणांची अंत्ययात्रा! जळगाव अपघातातील मृतांची संख्या 12 वर
घटनेचे वृत्त कळताच अर्बन बँकेचे चेअरमन भरत ललवाणी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, शरद पाटील, रवी पाटील, हितेश चिंचोरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. ४ वर्षांपूर्वीही याच ठिकाणी बितराई यांना लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र, पोलिसांना धागेदोरे मिळाले नाहीत.
हेही वाचा - जळगावात एकाच कुटुंबातील १० जणांचा आपघाती मृत्यू , मुलीचे रिसेप्शन आटोपून परतत होते घरी