जळगाव - तालुक्यातील सुभाषवाडी येथे चोरट्यांनी 24 फेब्रुवारीला भरदिवसा घरात प्रवेश करुन 84 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गोविंद भावलाल राठोड (वय 37 वर्षे, रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) यांच्या घरी ही चोरी झाली आहे. सकाळी नऊ वाजता राठोड व त्यांच्या पत्नी हे दोघे शेतात कामासाठी गेले होते. त्यांच्या दोन्ही मुली शेजारच्यांकडे अभ्यास करत होत्या. यावेळी राठोड यांनी घराचा दरवाजाला कडी लावलेली होती. ही संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लाेखंडी पेटीचे कुलूप तोडून त्यातील 64 हजार रुपये किंमतीचे दागिने व 20 हजार रुपयांची रोकड, असा 84 हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
दुपारी एक वाजता राठोड दाम्पत्य शेतातून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाच्या खिशातून लांबवला मोबाईल
जळगाव शहरातील भुषण कॉलनी सचिन भगवान मराठे (वय 21 वर्षे) या तरुणाच्या खिशातून चोरट्यांनी सहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता भुषण कॉलनीत ही घटना घडली. या प्रकरणी सचिन याने दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - जळगाव: रेशनच्या धान्य वितरणात ७५ लाखांचा अपहार, ७ जणांविरूध्द गुन्हा