जळगाव : अमळनेर तालुक्यातील सात्री गावात मंगळवारी सकाळी एक अतिशय दुर्दैवी आणि शासकीय यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना घडली. मुसळधार पावसामुळे बोरी नदीला पूर आल्याने सात्री गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला. अशातच तापाने फणफणत असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला वेळेवर दवाखान्यात घेऊन जाता आले नाही. त्यामुळे उपचाराअभावी तिचा नदीच्या काठावरच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे. आरुषी सुरेश भिल असे मृत मुलीचे नाव आहे. ती सात्री येथील रहिवासी होती.
नेमकं काय घडलं?
सात्री गावातील सुरेश भिल यांची मुलगी आरुषी ही गेल्या काही दिवसांपासून तापाने आजारी होती. मंगळवारी सकाळी ताप वाढल्याने तिला अत्यवस्थ वाटू लागले. म्हणून तिला शेजारच्या गावातील दवाखान्यात हलवण्याची तयारी तिच्या आई-वडिलांनी केली. पण नदीला पूर असल्याने पलीकडच्या गावात जाणे शक्य नव्हते. इकडे आरुषीची तब्येत आणखीनच बिघडली. मग काही ग्रामस्थांनी एका खाटेला हवा भरलेले ट्यूब बांधून नाव तयार केली. त्यावर आरुषी व तिच्या आईला बसवून नदी पार केली. परंतु, तोवर उशीर झाला होता. दवाखान्यात पोहचेपर्यंत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आरुषीचा जीव वाचला नाही. म्हणून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासनाला आणखी किती जणांचे जीव गेल्यावर जाग येईल? असा संतप्त सवाल यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला.
सात्रीच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित
अमळनेर तालुक्यातील सात्री हे गाव तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्पामुळे पुनर्वसित आहे. मात्र, गेल्या 8 वर्षांपासून या गावच्या पुनर्वसनासह सोयीसुविधांचा प्रश्न प्रलंबित आहे. शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करूनही सात्रीकरांच्या अडचणी सुटलेल्या नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात बोरी नदीला पूर आला की सात्रीचा इतर गावांशी संपर्क तुटतो. अशा वेळी आणीबाणीच्या परिस्थितीत पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते. नदी ओलांडण्यासाठी दुसरा कोणताही रस्ता नसल्याने याठिकाणी पूल उभारण्याची मागणी आहे. पण ती दुर्लक्षितच आहे.
प्रशासनाला पूर्वकल्पना देऊनही उपाययोजनांचा अभाव
सात्री गावाचे 8 वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे. बोरी नदीला पूर आला तर गावातून बाहेर निघायला रस्ता नाही. 2 दिवसांपूर्वीच अप्पर जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी यांनी नव्या पुनर्वसित गावठाणाला भेट दिली होती. त्यावेळी माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी गावात व्हायरल तापाचे रुग्ण आहेत. पुरामुळे रस्ता नाही. अशा परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात कसे नेऊ? प्रशासनाने गावात डॉक्टर पाठवावेत, अशी मागणी बोरसे यांनी केली होती. मात्र, 'निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही. गावातून ये-जा करायला आपत्ती व्यवस्थापनाची बोट देखील पाठवली नाही. आज एका मुलीचा अंत झाला आहे. आणखी किती बळी प्रशासन घेणार?', असा सवाल महेंद्र बोरसे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला.
हेही वाचा - नागपूर : महिलेची व्हरांड्यातच प्रसूती, बाळ दगावले; रुग्णालय कर्मचाऱ्यांनी दाखल करून न घेतल्याचा आरोप