जळगाव - भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन शनिवारी (15 ऑगस्ट) साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होईल. या समारंभासाठी प्रत्येक विभागावर सोपविण्यात आलेली जबाबदारी सर्व संबंधितांनी समन्वयातून जबाबदारीपूर्वक पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी राऊत बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेश चंदेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे (ग्रामपंचायत), शाखा अभियंता आर. आर. चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
महानगरपालिकेने शहरातील सर्व भागाबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. रस्त्यावर किंवा कुठेही कचरा दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. शासकीय कार्यालयांनीही आपापले कार्यालय व परिसरात स्वच्छता ठेवावी. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ज्या शासकीय विभागांकडून जिल्हास्तरावर पुरस्कार वितरण होणार असेल, अशा विभागांनी पुरस्कारार्थींच्या नावांची यादी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपवावी. जेणेकरुन पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन करणे सुलभ होईल, अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या़
शैक्षणिक संस्थांनी ऑनलाइनद्वारे स्पर्धा घ्याव्या
स्वातंत्र्य दिनी वृक्षारोपण, आंतर शालेय, आंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाइन वाद-विवाद, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. जिल्हा पोलिस विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पुरेशी सुरक्षा व्यवस्था, राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यासाठी बॅन्डपथक तयार ठेवावे. शहरात सुरक्षा व्यवस्था ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील बगीचाचे सुशोभिकरण करावे. तसेच आवश्यक तेथे रंगरंगोटी करावी. त्याचबरोबर मुख्य शासकीय समारंभाच्या कालावधीत म्हणजेच सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत कुठेही शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असेही निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले.