जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील शास्त्री नगरात असलेल्या गणपती मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे पूजेसाठी काही जण मंदिरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, चोरीस गेलेल्या दानपेटीत किती रक्कम होती? हे स्पष्ट होऊ शकले नाही.
शास्त्रीनगर हा चाळीसगाव शहरातील गजबलेला परिसर आहे. याच परिसरातील गणपती मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी लांबवली. ही दानपेटी 30 किलो वजनाची होती. त्यामुळे चोरटे 2 किंवा 3 असावेत, असा अंदाज आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. हीच संधी साधून चोरट्यांनी हा डाव साधला आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यातही झाली होती चोरी-
गेल्य महिन्यातदेखील याच मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. मंदिरातील सव्वा किलो वजनाची चांदीची गणपतीची मूर्ती चोरीस गेली होती. त्यानंतर आता चोरट्यांनी दानपेटीच चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे.