जळगाव - अलाहाबाद न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल संवेदनशील तसेच धार्मिक बाबीशी निगडित आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून येणाऱ्या निकालाचे जनता स्वागत करेल, असा विश्वास विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा... 'अयोध्या' प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमां जवळ व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, गेल्या 100 वर्षांपासून अयोध्या येथील विवादित जागेचा प्रश्न प्रलंबित होता. या प्रश्नी सर्वोच्च न्यायालय आज शनिवारी अंतिम निकाल देणार आहे. 2 एकर 7 गुंठे जागेवर पूर्वी मंदिर होते की मशीद होती, याबद्दलचा हा वाद प्रलंबित होता. या विषयासंदर्भात सगळ्याच पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात अत्यंत संयमपूर्वक भूमिका घेऊन युक्तिवाद केलेला आहे, असे निकम म्हणाले.
हेही वाचा... जातीय व धार्मिक सलोख्याची परंपरा अबाधित ठेवूयात - पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते
अयोध्या प्रकरणाच्या निकालासंदर्भात समाज माध्यमांवर पसरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांततेचा भंग होणार नाही, धार्मिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. न्यायालयाने दिलेला निकाल प्रत्येकाने पाळायला हवा, असेही आवाहन निकम यांनी केले.