जळगाव - कोरोनाचा दुसरा स्ट्रेन अतिशय घातक असल्याच्या बातम्या येत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. मात्र, अशा परिस्थितीत एक दिलासादायक घटना जळगावात घडली आहे. कोरोनाबाधित मातेच्या पोटी जन्म घेतल्यानंतर सातव्या दिवशी एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली होती. या बालकाने कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आज (२५ एप्रिल) बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
जळगाव शहरातील तुकारामवाडी भागातील रहिवासी अंशू योगेश चौधरी या कोरोना पॉझिटिव्ह महिलेला प्रसूतिसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अंशू चौधरी यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिला. मात्र, जन्मानंतर नवजात बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. म्हणून २९ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात बाळाला दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाळाचा कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतला होता. तेव्हा बाळाचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला. परंतु, बाळाला श्वास घेण्याचा त्रास सुरूच होता. म्हणून डॉक्टरांनी बाळाच्या हृदयाची तपासणी करून घेतली. त्या तपासणीत atrial septal defect असल्याचे समजले. बाळाच्या पांढऱ्या पेशी खूप जास्त वाढल्या होत्या. तसेच बाळाचा श्वासचा त्रासही वाढल्याने प्रोटोकॉलनुसार कोरोना चाचणीसाठी दुसरा स्वॅब सातव्या दिवशी घेण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर बाळाची योग्य ती काळजी घेण्यात आली.
3 आठवड्यांनी कोरोनाला हरवले-
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांनी बाळावर योग्य ते उपचार केले. अखेर २७ दिवसांनी बाळाची व एसएनसीयू टीमची कोरोनाविरुद्ध सुरू असलेली झुंज यशस्वी ठरली. २७ व्या दिवशी बाळ कोरोनातून पूर्णपणे बरे झाले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. वृषाली सरोदे, डॉ. अखिलेश खिलवाडे, डॉ.शैलजा चव्हाण आदींच्या वैद्यकीय पथकाने बाळावर उपचार करण्यासाठी परिश्रम घेतले. २७ व्या दिवशी बाळ सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. बाळाला कुशीत घेतल्यानंतर तिच्या आईला अश्रू अनावर झाले. दरम्यान, या नवजात बाळाच्या आईनेही कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.