जळगाव - बैलगाडीच्या बाजूला वीज कोसळली. मात्र, दैव बलवत्तर असल्याने बैलगाडीतील १० शेतमजूर बालंबाल बचावले. ही घटना आज (बुधवारी) दुपारी जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील जिन्सी येथे घडली आहे. सुदैवाने वीज बैलगाडीवर कोसळली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
जिन्सी येथील काही शेतमजूर नेहमीप्रमाणे सकाळी शेतात कामाला गेलेले होते. दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतमजूर बैलगाडीतून घराकडे परतत होते. रस्त्यात बैलगाडीच्या जवळच वीज कोसळली. विजेच्या कडकडाटामुळे बैलगाडीतील १० मजुरांना धक्का बसला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मजुरांना तत्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवले.
हे मजूर घटनेतून बचावले -
या घटनेत बळीराम दल्लू पवार (वय २१), दिलीप लक्ष्मण पवार (वय २१), अरविंद साईराम पवार (वय १५), ईश्वर दल्लू पवार (वय १५), कमलसिंग लक्ष्मण पवार (वय २०), अनिल लक्ष्मण पवार (वय २७), बिंदुबाई लक्ष्मण पवार (वय ५०), साईराम मोरसिंग पवार (वय ३७), मलखान मोरसिंग पवार (वय ४५), लक्ष्मण मोरसिंग पवार (वय ५५) हे मजूर बचावले आहेत. त्यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तहसीलदारांकडून विचारपूस -
या घटनेची माहिती मिळताच रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मजुरांची भेट घेऊन घटनेबाबत विचारपूस केली. विजेच्या कडकडाटाने मजूर घाबरले. सुदैवाने त्यांना इजा झालेली नाही, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.