जळगाव - शहरातील रिंगरोड चौकातील गोकुळ स्वीट मार्टमध्ये समोस्यात पालची शेपटी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. काही तरुण या स्वीट मार्टमध्ये नाश्ता करण्यासाठी आले होते. समोसा खात असताना एका तरुणाला अर्धा समोसा खाऊन झाल्यावर समोस्यात पालची शेपटी दिसली. त्यानंतर त्या तरुणाला उलट्या झाल्या. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. संबंधित तरुणाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण? -
खोटेनगरातील रहिवासी गौरव पाटील या तरुणासह त्याचे मित्र शंभू भोसले व हरीश भोसले हे दुपारी १ वाजेच्या सुमारास गोकुळ स्वीट मार्टमध्ये नाश्त्यासाठी गेले होते. या ठिकाणी गौरवने समोसा तर त्याच्या मित्रांनी खमण मागविले. समोसा अर्धा खाल्ल्यानंतर त्याला कडवटपणा जाणवला. त्याने समोसा पाहिल्यानंतर त्यात पालची शेपटी आढळून आली. त्यानंतर त्याला काही वेळाने उलट्या झाल्या. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून तपासणी -
या प्रकारानंतर पोलिसांना तसेच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना घटनेबाबत माहिती देण्यात आली. पोलीस तत्काळ गोकुळ स्वीट मार्टमध्ये दाखल झाले. अन्न सुरक्षा अधिकारी एस. डी. महाजन व विवेक पाटील यांनी तपासणी केली. या तपासणीत त्यांना अस्वच्छता, खाण्याच्या पदार्थांमध्ये काही किटक, उंदीर सहज जावू शकतात, अशा मोकळ्या जागा, कामगारांचे कपडे त्या ठिकाणीच ठेवलेले अशा त्रुटी आढळल्या. तपासणीचा अहवाल अन्न सुरक्षा आयुक्तांना सादर करून कारवाई होईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, स्वीट मार्टचे मालक सखाराम चौधरी यांनी असा काही प्रकार घडलाच नाही. संबंधित तरुण काही दिवसांपूर्वी आले होते. त्यांनी शिवीगाळ केली होती. पूर्ववैमनस्यातून त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप केला.