जळगाव - बिहार निवडणुकीच्या निकालात भाजपासह एनडीएला मोठी आघाडी मिळत असल्याचे प्रथमदर्शनी चित्र आहे. भाजपाची विजयाकडे वाटचाल सुरू होताच जळगाव शहरातील भाजपाच्या वसंत स्मृती जिल्हा कार्यालयात नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मिठाईचे वाटप करत जल्लोष साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली. त्यानंतर ८ वाजेपासून निकालाचे कल हाती यायला लागले आहेत. सकाळी ९ वाजपेर्यंत महाआघाडी पुढे असल्याचे चित्र होते. मात्र, तासभरात चित्र बदलून पुन्हा भाजपासह एनडीएने आघाडी घेतली आहे. एनडीएची विजयाकडे वाटचाल सुरू होताच शहरात भाजपातर्फे मिठाई वाटण्यात आली.
भाजपा कार्यालयासमोर मिठाईवाटप
जळगावातील बळीरामपेठेत स्थित भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयासमोर भाजपाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र झाले होते. बिहारमधील विजयाबद्दल या ठिकाणी जल्ल़ोष करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून जल्लोष केला.
प्रभारी फडणवीस असल्याचा आनंद – आमदार भोळे
बिहारमधील आघाडी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितिशकुमार यांच्यासह भाजपाला नागरिकांना दिलेला कौल आहे. विशेष म्हणजे भाजपाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी होती. त्यामुळे आम्हाला अधिक आनंद झाल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केली. बिहारच नाही, देशातील इतर राज्यांमध्येही भाजपाला स्पष्ट बहुमत दिले आहे. लोकांनी विकासाला मतदान केले आहे. भविष्यात असाच विश्वास महाराष्ट्रात देखील मतदार दाखवतील, असा विश्वास आमदार भोळे यांनी व्यक्त केला.