जळगाव - राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असताना गेल्या चार दिवसांपासून मुंबईत असलेले भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे हे जळगावात परतले आहेत. ते रविवारी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत काही पत्ते उघडतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यांनी विषयावर बोलणे टाळत मौन बाळगले.
त्याचबरोबर, जिल्ह्यातील जामनेर येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही? याबाबत एकनाथ खडसे यांनी 'सस्पेन्स' कायम ठेवला आहे. फडणवीस यांच्यासोबत उपस्थित राहायचे की नाही? याबाबत उत्सुकता राहू द्या, आत्ताच सगळे सांगून कसे चालेल, अशी टिप्पणी खडसे यांनी केली.
गेल्या चार दिवसांपासून मुंबईत एकनाथ खडसे हे शनिवारी रात्री उशिरा जळगावात परतले. त्यानंतर रविवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चेबाबत बोलण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. यावेळी काही मुद्द्यांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे सुरू केलेल्या रुग्णालयाच्या उदघाटन सोहळ्याचा कार्यक्रम 13 ऑक्टोबरला होणार आहे. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. एकीकडे, गेल्या महिन्यात एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांचे थेट नाव घेत थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबई मुक्कामी असताना ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली. त्यामुळे मंगळवारी जामनेर येथे फडणवीस यांना एकनाथ खडसे हे भाजपाचे नेते म्हणून भेटतील की, तोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये जातील, अशीही उत्सुकता निर्माण झाली. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल आपल्याला निमंत्रण पत्रिका आहे की, नाही हे पहावे लागेल, असे खडसे यांनी शनिवारी सांगितले होते.
त्यानंतर रविवारी याविषयी त्यांना विचारले असता 'सर्वच आता सांगून टाकले तर कसे चालेल, उत्सुकता राहू द्या', असे सांगितले. त्यामुळे एका दिवसावर आलेल्या या कार्यक्रमास खडसे उपस्थित राहणार की नाही, याबाबत सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीत जाईन तर उघडपणे, लपून-छपून जाणार नाही -
मुंबई येथे शरद पवार यांच्या भेटीबाबतच्या चर्चेबद्दल विचारले असता खडसे म्हणाले, मी राष्ट्रवादीत जाईन तर, उघडपणे जाईल. लपून-छपून जाणार नाही. मी काही चुकीचे काम केलेले नाही, असेही खडसेंनी यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना स्पष्ट केले.
'ते' प्रदेशाध्यक्षांनाच विचारा -
राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेबद्दल बोलताना मीडिया खडसे यांना पक्षातून बाहेर ढकलत आहे, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्याबद्दल मीडिया ढकलत आहे की नाही? याविषयी त्यांनाच विचारा, असे उत्तर देत खडसेंनी अधिक बोलणे टाळले.