जळगाव - दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या 48 खासदारांमध्ये सुसंस्कृत आणि अभ्यासू असलेल्या रक्षा खडसे या माझ्या आवडत्या महिला खासदार आहेत. धडपड करणारे नेतृत्त्व म्हणून मला त्यांचे कौतुक वाटते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार रक्षा खडसेंवर स्तुतिसुमने उधळली. शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशाळा तसेच उद्योजकता विकास मंचतर्फे आयोजित 'उडान : संजीवनी नव- उद्योजकांसाठी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुळे बोलत होत्या.
खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, विद्यार्थिनींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनविण्यासाठी डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे अभ्यासक्रम पूरक आहेत. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत प्रयत्न करून विद्यार्थिनींना सहकार्य मिळवून देईन. तसेच मोठ्या फॅशन डिझायनिंग कंपन्या आणि डिझायनरसोबत महाविद्यालयाचा करार करण्यासाठी देखील मी प्रयत्नशील राहील. यामुळे विद्यार्थिनींना स्वत:ला यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविता येईल, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा - इंदोरीकरांचा कोल्हापुरातील कार्यक्रम रद्द; पुरोगामी संघटनांनी केला होता विरोध
यावेळी कौशल्य विकास प्रशाळा तसेच उद्योजकता विकास मंचतर्फे राबविण्यात येणाऱ्या 'उडान' योजनेंतर्गत नव उद्योजकांना पाठबळ म्हणून विविध साहित्य तसेच यंत्रसामुग्रीचे सुप्रिया सुळेंच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला माजीमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, प्राचार्य डॉ. एस. एस. राणे, लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी आणि सचिव प्रा. एन. एस. पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा - सुप्रिया सुळे झाल्या वृत्त निवेदिका; उपमुख्यमंत्री अजित पवारांची दिली बातमी
कार्यक्रमात फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमाच्या 5 तर ब्युटी थेरपी अभ्यासक्रमाच्या 8 विद्यार्थीनींना हाय स्पीड शिलाई, पिको मशीन आणि पार्लरचे एकूण 1 लाख 80 हजार 213 रुपयांचे साहित्य वितरीत करण्यात आले. लाभार्थी विद्यार्थिनींमध्ये नम्रता मोरे, दिपाली सोनवणे, मयुरी सूर्यवंशी, शारदा भोळे, सुवर्णा पाटील, दीपमाला चौधरी, उज्वला पाटील, मोहिनी मनोरे या ब्युटी थेरपी अभ्यासक्रमाच्या तर तृप्ती पाटील, ज्योत्स्ना बजाज, उत्कर्षा नारखेडे, शीतल बाहेती, ममता वराडे या फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमाच्या 5 विद्यार्थिनींना बीज भांडवल वितरित करण्यात आले.