जळगाव - फळ विक्रीच्या हातगाड्या जप्त केल्याचा राग आल्याने 2 फळ विक्रेत्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर दगडफेक केली. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास शहरातील सागरपार्क मैदानाजवळ घडली. याप्रकरणी फळ विक्रेत्या दोन्ही भावांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Stone pelting on corporation employee](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-jlg-02-attack-on-corporation-employee-7205050_10042020143633_1004f_1586509593_240.jpg)
अश्फाक मुश्ताक बागवान आणि अल्ताफ मुश्ताक बागवान अशी दगडफेक करणाऱ्या दोघांची नावे आहेत. या घटनेनंतर दोघे घटनास्थळाहून पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना लागलीच दंगलग्रस्त भागातून अटक केली. त्यानंतर दोघांना रामानंदनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सुदैवाने या घटनेत अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दुखापत झाली नाही. मात्र, दगडफेकीमुळे अतिक्रमणाचे जप्त केलेले साहित्य वाहणाऱ्या ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे.
नेमकं काय घडलं?
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून शहरात उघड्यावर फळे, भाजीपाला विकणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. सागरपार्क समोर हातगाडीवर फळे विकणारे अश्फाक मुश्ताक बागवान आणि अल्ताफ मुश्ताक बागवान यांना अतिक्रमण विभागाच्या पथकाने हटकले. मात्र, दोघांनी कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली. म्हणून पथकाने त्यांच्या हातगाड्या जप्त करून ट्रॅक्टरमध्ये टाकली. त्याचा राग आल्याने दोघांनी दगडफेक सुरू केली. त्यात ट्रॅक्टरचा हेडलाईट फुटला. नंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही पळून गेले.