जळगाव - 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.
जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत -
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व असते. माझ्या आयुष्यात आतापर्यंतच्या वाटचालीत गुरू म्हणून आई-वडिलांचीच प्रमुख भूमिका राहिली आहे. हे सांगताना मला सार्थ अभिमान वाटतो. गुरू म्हणून त्यांनीच मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. माझा उत्साह वाढवला, मला प्रेरणा दिली. त्यामुळेच मी घडू शकलो. त्यांनी दिलेली संस्काराची शिदोरी आणि शिकवण मी आयुष्यभर सोबत बाळगणार आहे, अशा भावना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केली.
अभिजित राऊत हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत. ते 2013 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय कामात ठसा उमटवल्यानंतर सध्या ते जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी कार्यरत आहेत.
यावेळी ते म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुणीतरी गुरू म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडलेली असतेच. कुणाच्या आयुष्यात आई-वडील तर कुणाच्या आयुष्यात शिक्षक गुरुस्थानी असतात. माझ्या आयुष्यात माझे आई-वडील खरे गुरू आहेत. गुरू म्हणून त्यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेली शिकवण, माझ्यावर केलेल्या संस्कारांचा माझ्या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे. हे सांगताना मला सार्थ अभिमान वाटतो. माझे वडील शिक्षक होते. त्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण होते. त्याचा मला खूप फायदा झाला. आई-वडिलांनी लहानपणापासून माझ्यावर जे संस्कार केलेत, तेच माझ्या आयुष्यभर शिदोरी म्हणून कायम सोबत असणार आहेत.
स्वतःपेक्षा आपल्या समोरील यशस्वी व्यक्तीकडे पाहावे, त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी. चांगल्या मनाने दुसऱ्यांची शक्य तेवढी मदत करावी, हा सेवाभाव मला आई-वडिलांनीच शिकवला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जी गोष्ट खरी आहे, त्या गोष्टीसाठी अतिशय नम्रपणे पण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, ही माझ्या आई-वडिलांनी दिलेली महत्त्वाची शिकवण आहे. याच शिकवणीवर अंमल करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो, असेही अभिजित राऊत म्हणाले.
शिक्षकांचाही वाटा महत्त्वपूर्ण -
आई-वडिलांप्रमाणे माझ्या आयुष्यात गुरू म्हणून शिक्षकांचाही वाटा महत्त्वपूर्ण आहे. शालेय ते पदव्युत्तरपर्यंतच्या शिक्षणाच्या वाटचालीत शिक्षक म्हणून लाभलेले सर्व गुरुजन माझ्या आदरस्थानी आहेत. गुरू म्हणून त्यांचाही माझ्या आयुष्यात महत्त्वाचा आणि न विसरता येणारा वाटा आहेच. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना मला जे मित्र, शिक्षक आणि मार्गदर्शक लाभले ते पण गुरुस्थानीच आहेत. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. असे म्हणतात की मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असतो. त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला ज्या व्यक्तीपासून शिकायला मिळते, ती व्यक्ती मला गुरुस्थानीच असते.
2013 नंतर मी प्रशासकीय सेवेत दाखल झालो. त्यानंतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मला मार्गदर्शन लाभले. त्यांनी मला खूप काही शिकवले. त्यांचाही मला गुरू म्हणून आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी माझ्या सर्व गुरूंना विनम्रपणे वंदन करतो, असेही अभिजित राऊत यांनी सांगितले.
कोविडची साथ आपल्यासाठी गुरुपेक्षा कमी नाही -
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, कळत-नकळत येणारे प्रसंगदेखील आपल्यासाठी गुरूच असतात. सध्या कोविडच्या साथीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोविडची साथ आपल्यासाठी एखाद्या गुरुपेक्षा कमी नाही. कारण कोविडने आपल्याला स्वयंपूर्णता, स्वयंशिस्त, आरोग्य आणि स्वच्छता अशा बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. कोविडच्या साथीपासून आपण धडा घेतला पाहिजे, असे मतही अभिजित राऊत यांनी व्यक्त केले.