जळगाव - मद्यतस्करी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह जळगाव पोलीस दलातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे. विशेष चौकशी समितीच्या प्राथमिक निरीक्षणात या सर्वांचे हात मद्यतस्करीत ओले झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे प्रकरण त्यांना चांगलेच महागात पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकरणाच्या चौकशी अधिकाऱ्यांनी सर्वांच्या निलंबनाचे प्रस्ताव तयार केले असून, सोमवारी त्यावर पोलीस अधीक्षकांकडून शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
मद्यतस्करी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांची पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तडकाफडकी उचलबांगडी केली. त्यांच्याकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार काढून घेतला आहे. सध्या ते 'कंट्रोल' रुमला जमा आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन हे सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. रविवारी त्यांनी रणजित शिरसाठ यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक जीवन काशिनाथ पाटील, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे नाईक संजय जगन्नाथ जाधव, मुख्यालयातील पोलीस नाईक मनोज केशव सुरवाडे तसेच तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार भारत शांताराम पाटील यांना चौकशीसाठी मुख्यालयात बोलावले होते. सर्वांची कसून चौकशी करण्यात आली असून जबाब देखील नोंदवले आहेत. या चौकशीअंती डॉ. नीलाभ रोहन यांनी सविस्तर अहवाल तयार केला असून तो पोलीस अधीक्षकांना सादर करणार आहेत. चौकशीत दोषी आढळल्याने मद्यतस्करीतील सर्वांचे निलंबन अटळ असल्याचे संकेत डॉ. रोहन यांनी याबाबत बोलताना दिलेत.
सोमवारी निघणार आदेश ?
चौकशी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाची पडताळणी केल्यावर पोलीस अधीक्षक सोमवारी सर्वांच्या निलंबनाचे आदेश काढतील, अशी शक्यता आहे. या प्रकरणामुळे जळगाव पोलीस दलाची प्रतिमा डागाळली असून, त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.
शिरसाठ यांच्या संपत्तीचीही होणार चौकशी ?
या साऱ्या प्रकरणात पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ हे 'मास्टरमाइंड' असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यांनी मद्यतस्करीच्या माध्यमातून काही अपसंपदा जमवली आहे का ? याचाही तपास केला जात आहे. त्यामुळे शिरसाठ यांच्या संपत्तीची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आर. के. वाईन प्रकरणात त्यांची भागीदारी होती का ? या दृष्टीनेही चौकशी होत आहे.