जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्वच उद्योग, व्यवसाय ठप्प असल्याने हातावर पोट असलेल्या स्थानिक लोकांसह मुंबई, पुणे, नाशिकसारख्या महानगरातून घराकडे परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांचा दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बिकट परिस्थितीत गरजूंच्या मदतीसाठी विविध सेवाभावी संस्था पुढे येत आहेत. जळगावात अशाच प्रकारे अनेक संस्थांनी एकत्र येऊन अडचणीत सापडलेल्या लोकांना मदतीचा हात दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने उभारलेल्या निवारागृहांमध्ये सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून दररोज हजारो लोकांची भूक भागत आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हाताला काम नसल्याने जळगाव शहरातील झोपडपट्टी भागातील लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे, उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने महानगरांमधून गावाकडे परतणारे परप्रांतीय मजूर, कामगारांचे देखील असेच हाल होताय. लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदी असल्याने जिल्हा प्रशासनाने घरी जाणाऱ्या शेकडो परप्रांतियांना अडवून सुरक्षेच्या कारणास्तव निवारागृहात हलवले आहे. जळगावातील नाथ फाउंडेशन या लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. नाथ फाउंडेशनचे विधायक कार्य पाहून शिवसह्याद्री प्रतिष्ठान, संत गोदडीवाले बाबा हरदास सेवा मंडळ, जैन इरिगेशन सिस्टीम, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, लाडवंजारी मंगल कार्यालय तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीने देखील या सेवाकार्याला हातभार लावला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर नाथ फाउंडेशनच्या वतीने लाडवंजारी मंगल कार्यालयात गोरगरीब नागरिक तसेच परप्रांतियांसाठी अन्नछत्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी दररोज सकाळी भाजी-पोळी तसेच रात्री खिचडी असे सात्त्विक जेवण लोकांना दिले जात आहे. सकाळ व रात्री मिळून सुमारे 5 हजार लोकांची भूक भागत आहे. याकामी विविध सेवाभावी संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. विशेष म्हणजे, जळगावातील झोपडपट्टी परिसरात घरोघरी जाऊन जेवणाची पाकिटे दिली जात आहेत. मंगल कार्यालयात येणाऱ्यांना देखील जेवण दिले जात आहे.
परप्रांतियांची खास सोय-
लाडवंजारी मंगल कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या वतीने परप्रांतियांसाठी निवारागृह उभारले आहे. याठिकाणी परप्रांतियांची जेवणासह राहण्याची खास सोय करण्यात आली आहे. ब्लँकेट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह अशा प्रकारच्या सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी योगेश्वर नन्नवरे, मेहरुणचे तलाठी सचिन माळी, शहर तलाठी रमेश वंजारी, महिला व बालविकास विभागाच्या रंधे यांची याठिकाणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते दररोज किती लोकांना जेवण दिले, किती परप्रांतीय निवारागृहात आले, याचा अहवाल प्रशासनाला सादर करत आहेत. सद्यस्थितीत याठिकाणी 48 परप्रांतीय असून इतरांना सोशल डिस्टन्सिंग म्हणून इतर निवारागृहात हलवले आहे. विशेष म्हणजे, निवारागृहातील नागरिकांचे मोफत समुपदेशन देखील केले जात आहे. कोणाला काही आजारपण जाणवत असेल तर लागलीच वैद्यकीय सुविधा पण उपलब्ध करून दिली जात आहे.