जळगाव - दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना बैलपोळ्याचा सण साजरा करताना अडचण येऊ नये, म्हणून जळगावातील नेहरू चौक मित्र मंडळ परिवार शेतकऱ्यांसाठी धावून गेला आहे. या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत तब्बल दीडशे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पोळ्याच्या सणासाठी बैलांचा पूर्ण साज वाटप केला.
वर्षभर शेतात आपल्या मालकासोबत राब-राब राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा होणारा बैल पोळ्याचा सण म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणीच असते. प्रत्येक शेतकरी हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतो. परंतु, जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने यावर्षी पोळा सण कसा साजरा करावा? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर आहे. हीच बाब लक्षात घेऊन नेहरू चौक मित्र मंडळ परिवाराने शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. जळगाव तालुक्यातील विविध गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बैलपोळ्यानिमित्त पूर्ण साज वाटप करण्याचे त्यांनी ठरवले. याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करत एकत्र बोलावण्यात आले. एका जाहीर कार्यक्रमात सर्व शेतकऱ्यांना झूल, गोंडा, दोर, नाडा, घुंगरू, रंगाची डबी, गळ्यातील चामडी पट्ट्याची घंटा, मोरकी असा साज मोफत देण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने नेहरू चौक मित्र मंडळ दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवत असते. यावर्षी मंडळाने शेतकऱ्यांसाठी राबविलेला उपक्रम कौतुकाचा विषय ठरला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबविला, अशी माहिती यावेळी मंडळाचे अध्यक्ष रिंकेश गांधी यांनी दिली.