जळगाव- शुक्रवारचा अपवाद वगळता गेल्या आठवड्यापासून सतत घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात आज देखील घसरण झाली. सुवर्ण बाजार उघडताच चांदीचे भाव ८०० रुपये प्रतिकिलोने कमी होऊन ते ५९ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आले. तसेच, सोन्याच्या भावात २०० रुपयांनी घसरण होऊन ते ५० हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
कोरोनाचा संसर्ग पसरल्यापासून सुवर्ण बाजार अस्थिर झाला आहे. त्यात लॉकडाऊन दरम्यान कमोडिटी बाजारातही सोने चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होत राहिला. बाजारपेठ झाल्यानंतरही दलालांच्या खरेदी विक्रीच्या माऱ्यामुळे सोने चांदीचे भाव अचानक कमी-जास्त होत आहे. यामुळे सुवर्ण व्यावसायिकही चिंतीत झाले आहे. अशात आज नवीन आठवड्याला सुरुवात होताच गेल्या आठवड्याप्रमाणे सोने-चांदीच्या भावात घसरण सुरू झाली. यामध्ये ६० हजार रुपये प्रतिकिलोवर असलेल्या चांदीच्या भावात ८०० रुपयांनी घसरण होऊन ती ५९ हजार २०० रुपयांवर आली. तसेच, सोन्याचेही भाव दोनशे रुपयांनी कमी होऊन ते ५० हजार ३०० रुपयांवरून ५० हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
हेही वाचा- जळगावच्या देऊळवाड्यात तीन गावठी दारुभट्ट्या उद्ध्वस्त, तिघे ताब्यात