जळगाव- नगरोथ्थान योजनेतून महापालिकेस मंजूर करण्यात आलेली ४२ कोटी रुपयांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याबाबत शासनाने आदेशित केले आहे. याच विषयावरून शनिवारी झालेल्या महासभेत विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने सत्ताधारी भाजपला चिमटे काढले. 'शासन तुला महापालिकेवर भरवसा नाय का', 'शासन तुला तुझ्याच भाजपच्या नगरसेवकांवर भरवसा नाय का', असे गाणे म्हणत शिवसेनेने भाजपची चांगलीच खिल्ली उडविली. मात्र, हा एकमेव विषय सोडला तर शिवसेनेने भाजपला कुठेही विरोध न करता सभा आटोपती घेतली. यामागे आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती असल्याची चर्चा आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत युतीचे संकेत असल्याने एकमेकांची उणी दुणी काढणारे भाजप-सेना महासभेत गळ्यात गळे घालताना दिसले. एरवी महासभेत भाजपला घेरण्याची संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने या सभेत मात्र, सपशेल शांत भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक युतीच्या माध्यमातून लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महापालिकेची महासभा शनिवारी महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. महासभेच्या विषयपत्रिकेवरील १८ विषयांपैकी दोन विषय तहकूब ठेवून १६ विषय मंजूर करण्यात आले. तसेच आयत्यावेळी आलेल्या तीन विषयांना देखील मंजुरी देण्यात आली. सभेच्या विषयपत्रिकेवरील भूसंपादनाचे सर्व विषय जमीन मालकांना मोबदला म्हणून टीडीआरचा प्रस्ताव देण्याचा निर्णय घेवून मंजूर करण्यात आले.
४२ कोटीच्या कामांवरुन खडाजंगी-
शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी महापालिकेस नगरोथ्थान योजनेमधून ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री, पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे महापालिकेचा ३० टक्के हिस्सा शासनाने दिला नसल्याची माहिती त्यांनी दिली. या निधीपैकी ४२ कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. यातील महापालिकेचा १२ कोटी रुपये हिस्सा कसा आणणार? असा प्रश्न लढ्ढा यांनी उपस्थित केला. त्यावर भाजपच्या सदस्यांनी आपली भूमिका मांडत सेनेचा मुद्दा खोडून काढला. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
महापालिकेच्या दुर्लक्षित जागांच्या विषयावर मंथन-
ऍड. सुचिता हाडा यांनी महापालिकेच्या दुर्लक्षित जागांचा विषय मांडला. महापालिकेच्या अनेक जागा वापरात नसून त्या शोधून ताब्यात घेणे व त्यातून उत्पन्न मिळविण्यासाठी एक सक्षम अधिकारी नेमण्याची सूचना त्यांनी मांडली. यावेळी नितीन लढ्ढा यांनी मेहरुण येथील घरकुलासाठी संपादित जागेचा मोबदला देवून देखील जमीन मालकाने काही भाग कब्जात ठेवला असल्याचे सांगितले. तसेच अपूर्णावस्थेतील घरांमध्ये बेकायदेशीर कब्जा करुन काही जण गुरे बांधत आहेत. तर काही ठिकाणी अवैध धंदे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.