जळगाव - कोरोनाचा जळगाव जिल्ह्यात उद्रेक झाला असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या पुढे गेली आहे. असे असताना आरोग्य यंत्रणेला मात्र कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चक्क नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचा एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या अशा चुकांमुळेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगावातील आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणाचे धक्कादायक किस्से सातत्याने समोर येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर खबरदारीच्या दृष्टीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने काही निकष घालून दिले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी त्या निकषांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु, जळगावातील आरोग्य यंत्रणेने सर्वप्रकारचे निकष धाब्यावर बसवले.
तोंडाला मास्क, हातात ग्लोज अन् बेफिकीरीचा कळस
अमळनेर येथील एका कोरोनाबाधित पुरुषाचा सरकारने अधिग्रहित केलेल्या डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेजमध्ये मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या पुरुषाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी जळगावातील नेरीनाका स्मशानभूमीत आणल्यानंतर थेट त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, मृताच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करताना तोंडाला मास्क आणि हातात ग्लोज सोडले तर अंगात पीपीई कीट घातलेले नव्हते. त्यांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून खाली उतरवणे, तो स्मशानभूमीतील दहन ओट्यापर्यंत नेणे, त्यानंतर चितेवर ठेवणे असे सोपस्कार पार पाडून बेफिकीरीचा कळस गाठला आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली बघ्याची भूमिका
यावेळी पीपीई कीट परिधान केलेल्या महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केवळ पाहणीचा सोपस्कार पार पाडला. वास्तविक पाहता, कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला त्याच्या नातेवाईकांना उपस्थित राहण्यास मनाई आहे. मात्र, या व्यक्तीची पत्नी तसेच इतर नातेवाईक त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांना कुणीही हटकले नाही.
आरोग्य कर्मचाऱ्यांना नाही स्वतःच्या जीवाची पर्वा
दुसऱ्याची तर सोडा, पण आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वतःच्या जीवाची देखील पर्वा नसल्याचे दिसून आले. कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना होणारी एक चूक जीवावर बेतू शकते. म्हणून कोरोनाबाधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट, डोळ्यांना गॉगल अशी सुरक्षेची साधने वापरणे आवश्यक आहे. मात्र, ते हलगर्जीपणा करतात. अनेकदा मृतदेह घेऊन येणारी रुग्णवाहिका आल्यावर मृतदेहाच्या जवळच जाऊन आरोग्य कर्मचारी पीपीई कीट घालतात. मंगळवारीही असेच घडले. अमळनेरच्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आल्यानंतर तेथे असलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी मृतदेहाजवळ जाऊन पीपीई कीट घातले. मृतदेहाला अग्निडाग दिल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी अंगावरील पीपीई कीट देखील चितेवर फेकून जाळून टाकले. पीपीई कीट वापरून झाल्यानंतर त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन व्हायला हवे. पण तसे होत नाही. अशामुळे कोरोनाचा संसर्ग बळावण्याची दाट शक्यता आहे.
यापूर्वीच्या घटनांमधून घेतला नाही बोध
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्ग वाढीला प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. कोरोनाबाधिताचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याने जळगाव, अमळनेर, भडगाव, भुसावळ याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. मात्र, तरीही प्रशासनाने या घटनांमधून बोध घेतलेला नाही.