जळगाव - जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे 16 कोटी रुपयांची देणी अडकली आहेत. शेतकऱ्यांची देणी तसेच कारखान्याच्या कामगारांचे थकीत पगार मिळावेत, या मागणीसाठी आज दुपारी शिवसेनेच्या वतीने फैजपुरात बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे 1 हजार 700 ते 1 हजार 800 शेतकऱ्यांची 2017/18 च्या गळीत हंगामाची देणी बाकी आहेत. शेतकऱ्यांची थकीत असलेली उसाची रक्कम एफआरपीनुसार सुमारे 16 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्याचप्रमाणे या साखर कारखान्याच्या 1 हजार कामगारांचे पगार देखील रखडले आहेत. थकीत देणीसंदर्भात कारखान्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील दिलासा मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची थकीत देणी मिळणे गरजेचे आहे. हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून शिवसेनेने फैजपुरात बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलकांनी तब्बल 2 तास महामार्ग रोखून धरला. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांना थकीत देणी मिळाली नाहीत, तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
काय आहे 'मसाका'ची नेमकी परिस्थिती?
मधुकर सहकारी साखर कारखान्याची वाटचाल सध्या बिकट आहे. कारखान्याकडे 1 हजार 700 ते 1 हजार 800 शेतकऱ्यांची 2017/18 च्या गळीत हंगामाची 16 कोटी रुपयांची देणी बाकी आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखान्याकडे थकीत असलेले आधीचे कर्ज एनपीए केले आहे. त्यामुळे कारखान्याला नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. नव्याने कर्ज हवे असल्यास शासनाची थकहमी द्यावी, अशी अट जिल्हा बँकेने घातली आहे. सद्यस्थितीत कारखान्याची साडेसतरा हजार साखर पोती जिल्हा बँकेकडे तारण म्हणून पडली आहे. त्याची किंमत 51 कोटी रुपयांच्या घरात असताना बँक कर्ज देण्यास मनाई करत आहे.
त्यामुळे कारखाना 55 कोटी रुपये तोट्यात सुरू आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कारखाना शेतकऱ्यांना उसाचे थकीत पैसे तसेच कामगारांना पगार देऊ शकत नाही.
विधानसभेच्या तोंडावर रंगतेय राजकारण-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण रंगले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्यातील हाडवैर या रास्ता रोको आंदोलनामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात आहे. बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे खडसेंच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याकडे आहेत. त्यामुळे मुक्ताईनगरचा संत मुक्ताई साखर कारखाना चालू रहावा, म्हणून मधुकर सहकारी साखर कारखान्याला कर्ज नाकारून त्याचा बळी दिला जात आहे, अशी प्रतिक्रिया या आंदोलनप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.