जळगाव - शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. या पूर्वीच्या योजनेत जे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, त्यांनाही याचा लाभ मिळावा म्हणून 2 ते 3 सदस्यांची समिती नियुक्त केल्याची माहिती आहे. ही समिती खोलात जाऊन चौकशी करत असून, नवीन आर्थिक वर्षापासून सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल, असे संकेत माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावात दिले.
राज्य सरकारने 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र, फडणवीस सरकारच्या काळातील दीड लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जमाफी योजनेतून अनेक शेतकरी वंचित असल्याच्या मुद्यावर पवार यांनी अगोदर स्पष्ट केले की, या बाबत राज्य सरकार निर्णय घेऊ शकते. मात्र, पक्ष पातळीवरील माहितीनुसार 86 टक्के शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ झाला आहे. योजनेंतर्गत मंजूर रकमेच्यावरील रक्कम भरता न आल्याने केवळ 14 टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले असल्याचे पवार म्हणाले.
हेही वाचा - 'केंद्राला कोरेगाव-भीमा प्रकरणात काहीतरी झाकायचंय... म्हणूनच तपास 'एनआयए'कडे'
त्यासाठी याचा अभ्यास करण्यात येणार असून त्यासाठी 2 ते 3 सदस्यांची समिती मंत्रिमंडळाने नियुक्त केल्याची माहिती मिळाली आहे. ही समिती या विषयाच्या खोलात जाऊन चौकशी करणार असून नवीन आर्थिक वर्षात कर्जमाफी योजनेचा लाभ वंचित शेतकऱ्यांनाही मिळू शकेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
जळगाव जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी वंचित-
शरद पवारांनी दिलेल्या माहितीमुळे कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात जवळपास असे 20 हजार शेतकरी योजनेपासून वंचित राहिले असून त्यांनाही नवीन वर्षात लाभ मिळण्याचे संकेत यातून मिळत आहेत.
हेही वाचा - 'सरकार कोणाचेही असो महिलांवरील अत्याचार शोभनीय नाहीत'