जळगाव - कोणतीही स्पर्धा जिंकण्याची जिद्द असेल तर वयाचे बंधन आडवे येत नाही. हीच बाब नागपूरचे 72 वर्षीय ईश्वर रामटेके यांनी अधोरेखित केली आहे. जळगावात शिवजयंती निमित्ताने लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत रामटेके सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची छाप सोडत स्पर्धेचा आखाडा गाजवला. ईश्वर रामटेके यांच्या अंगी असलेली जिद्द तरुणांना प्रेरणादायी आहे.
लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने यावर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून खुल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत एका स्पर्धकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणजे 72 वर्षीय ईश्वर रामटेके यांनी. वयाच्या उत्तरार्धाच्या टप्प्यातही रामटेके आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर बुद्धिबळाचा पट म्हणजेच आखाडा गाजवत आहेत. यापूर्वी देखील त्यांनी देशभरात अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. वयाच्या सत्तरीनंतरही रामटेके यांनी बुद्धिबळ खेळण्याची आवड जोपासली आहे. म्हणूनच ते बुद्धिबळाच्या स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभागी होत असतात.
अशी लागली बुद्धिबळ खेळाची गोडी
ईश्वर रामटेके हे नागपूर शहरातील इंदुरा भागातील रहिवासी आहेत. ते वयाच्या पंधराव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळत आहेत. ते लहान असताना इंदुरा भागात काही तरुण बुद्धिबळ खेळत असत. त्यांची गंमत पाहत असताना रामटेके हेदेखील बुद्धिबळ खेळायला लागले. बुद्धिबळ खेळताना आपल्या बुद्धीचा कस लागत असल्याने त्यांना बुद्धिबळ खेळाची गोडी लागली. गल्लीत बुद्धिबळ खेळत असताना पुढे ते स्थानिक पातळीवर आयोजित होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. त्यात यश मिळत गेल्याने ते जिल्ह्याबाहेर आयोजित होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. अशा पद्धतीने बुद्धिबळ खेळाविषयीची त्यांची आवड वाढत गेली.
व्यवसाय सांभाळून जोपासली आवड
ईश्वर रामटेके हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले आहेत. ते पुस्तक विक्री करण्याचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय त्यांच्या पूर्वजांपासून सुरू आहे. आपला व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी आपली बुद्धिबळ खेळण्याची आवड जोपासली आहे. रामटेके यांनी अनेक जिल्हास्तरीय स्पर्धा तर गाजवल्या असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये देखील त्यांनी यश संपादन केले आहे.
तरुणांना दिला महत्त्वपूर्ण संदेश
बुद्धिबळ खेळणाऱ्या तरुणांना ईश्वर रामटेके यांनी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. ते म्हणाले, बुद्धिबळ खेळ खेळताना आपल्या बुद्धीचा कस लागतो. समोरची व्यक्ती आपल्यावर कशा पद्धतीने चाल करत आहे, याचा अंदाज घेत असताना त्याची चाल कशी परतावून लावायची, त्याला नामोहरम कसे करायचे, यासाठी आपल्याला बुद्धी चालावी लागते. बुद्धिबळ या खेळातून आपल्याला संकटात न डगमगता संकटावर कशा पद्धतीने मात करता येईल, याचा धडा मिळतो. या खेळामुळे बुद्धी कुशाग्र होते. त्यामुळे तरुणांनी बुद्धिबळ खेळ आवडीने खेळला पाहिजे, असे रामटेके म्हणाले. आताच्या काळात अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संगणकासारखा सक्षम पर्याय उपलब्ध आहेत. आता चांगले प्रशिक्षक देखील आहेत. त्यामुळे तरुणांनी बुद्धिबळ खेळण्याचा अधिक सराव केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - चिंताजनक.. जळगाव जिल्ह्यात साडेतीन महिन्यानंतर आढळले द्विशतकी कोरोनाबाधित