जळगाव - जिल्ह्यातील रावेर शहरातील संजीवन हॉस्पिटलमध्ये एका 25 वर्षीय महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेत महिलेच्या पोटातून तब्बल 7 किलो वजनाची मांसाची गाठ काढण्यात आली. संबंधित महिलेची प्रकृती स्थिर असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
रुकसाना तडवी (वय 25) असे शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव असून, ती रावेर तालुक्यातील पाडळा येथील रहिवासी आहे. संजीवन हॉस्पिटलमध्ये सर्जन डॉ. चंद्रदीप पाटील यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून रुकसाना तडवीचे प्राण वाचवले आहेत.
महिलेच्या पोटातून काढलेली गाठ काय आहे नेमका प्रकार?रुखसाना तडवी या महिलेचे प्रसूतीनंतरही अधूनमधून पोट दुखत होते. म्हणून तडवी यांनी सुरुवातीला रावेर तालुक्यातील खानापूर येथील डॉ. सुरेश पाटील यांच्याकडे उपचार घेतले. औषध उपचारानंतर त्यांना थोडे दिवस बरे वाटत होते. पण नंतर पुन्हा पोट दुखू लागले. तेव्हा सोनोग्राफीत त्यांच्या पोटात मांसाची गाठ तयार होत असल्याचे स्पष्ट झाले. त्रास वाढल्यानंतर तडवी यांनी संजीवन हॉस्पिटलचे डॉ. चंद्रदीप पाटील यांच्याकडे उपचार सुरू केले. तेव्हा त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉ. पाटील यांनी घेतला.
चार तास चालली जटील शस्त्रक्रिया -
डॉ. चंद्रदीप पाटील यांनी रुकसाना तडवी यांच्यावर गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 3 अशी तब्बल 4 तास शस्त्रक्रिया केली. तेव्हा तडवी यांच्या पोटातून 7 किलो वजनाचा मांसाचा गोळा यशस्वीरित्या काढण्यात यश आले. हा मांसाचा गोळा त्यांच्या पोटात गर्भाशयाजवळील बीजांडाजवळ होता. शस्त्रक्रियेसाठी डॉ. चंद्रदीप पाटील यांना भूलतज्ञ डॉ. निलेश पाटील यांनी सहकार्य केले.
असे प्रकार दुर्मीळ -
दरम्यान, या प्रकारासंदर्भात माहिती देताना डॉ. चंद्रदीप पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, रुकसाना तडवी यांच्याबाबतीत घडलेला प्रकार हा दुर्मीळ आहे. बाळंतपणानंतर काही स्त्रियांच्या पोटात अंडाशयाची वाढ होते. तडवी यांच्या पोटातही अशीच अंडाशयाची वाढ झाली होती. शस्त्रक्रिया करून पोटातील मांसल भाग काढण्यात आला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे डॉ. पाटील म्हणाले.