जळगाव - शहरातील तुकारामवाडीत एका शाळकरी मुलाने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवारी) दुपारी घडली. हर्षल ऊर्फ सोन्या दीपक कुंवर (वय १३, मूळ रा. शिंदखेडा ता. धुळे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तो जळगावात आपल्या मामाकडे आलेला होता. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी हर्षलने आपल्या मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून मृत्यूशी निगडित माहिती 'सर्च' केली आहे. त्याच्या मोबाईलच्या इंटरनेट हिस्ट्रीत तशी नोंद आढळली आहे. त्यामुळे हर्षलच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
घराच्या बाथरूममध्ये घेतला गळफास-
हर्षल आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांपासून तो जळगाव शहरातील तुकारामवाडीत त्याचे मामा दीपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. दीपक यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय आहे. आज मामा कामानिमित्ताने घराबाहेर होते. तर हर्षल व त्याची आजी प्रमिलाबाई हे दोघेच घरी होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आजी कामानिमित्ताने दुकानावर गेली होती. त्या दुकानावरून परत आल्यावर बाथरूममध्ये हर्षल हा साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. तुकारामवाडीतील काही नागरिकांनी हर्षलला तातडीने सुरुवातीला खाजगी रुग्णालयात यानंतर जिल्हा रुग्णालयात हलवले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल सोनवणे तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मृत्यूबाबत माहिती घेण्याचा केला प्रयत्न?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल याच्याकडे मोबाइल होता. मोबाईलमध्ये त्याने 'द डेथ क्लॉक' ही वेबसाईट ओपन करून पाहिली आहे. या वेबसाईटवर त्याने मृत्यूबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज आहे. त्याने युट्यूबसह अनेक वेबसाईट ओपन केल्याचे दिसून आले. त्याच्या इंटरनेट सर्चची हिस्ट्रीची वेळ आणि आत्महत्येची वेळ यात काही मिनिटांचेच अंतर आहे. त्यामुळे इंटरनेटवर मृत्यूबाबत सर्च करून त्याने आत्महत्या तर केली नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा-
मयत हर्षल याच्या पश्चात वडील दीपक कुंवर, आई कविता व बहीण कोमल असा परिवार आहे. त्याच्या वडिलांचा शिंदखेडा येथे कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. एकुलत्या एक हर्षलच्या हट्टापायी आईने त्याला पैसे नसल्याने हप्त्यांवर पैसे परतफेडीच्या हिशोबाने काही दिवसांपूर्वीच १५ हजार रुपयांचा नवीन मोबाइल खरेदी करून दिला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.