जळगाव - प्लास्टिक मोल्डेड फर्निचर बनवणाऱ्या एका कंपनीतून अज्ञात चोरट्याने साडेबारा लाख रुपयांची रोकड लांबवले. ही चोरीची घटना जळगाव शहरातील एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील स्वामी पॉलिटेक या कंपनीत शुक्रवारी पहाटे घडली असून, याप्रकरणी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गोदडीवाला हौसिंग सोसायटीमध्ये राहणारे भरत हरिशकुमार मंधान (वय ३५) यांची एमआयडीसीत स्वामी पॉलिटेक या नावाने प्लास्टीक मोल्डेड फर्निचर बनवण्याची कंपनी आहे. या कंपनीचे कामकाज भरत यांच्यासह त्यांचा लहान भाऊ सागर व मावस भाऊ वासुदेव उर्फ विक्की विजू पमनानी हे पाहतात. कंपनीचे मुख्य कार्यालय हे पहिल्या मजल्यावर आहे. भरत यांच्या कार्यालयाच्या बाजूला मावसभाऊ वासुदेव पमनानी यांची काचेची केबीन आहे. या केबीनमध्ये फेरीवाल्यांकडून जमा झालेले पैसे छोट्या कपाटात ठेवतात. भरत व वासुदेव या दोघांनी तीन ते चार दिवसांपासून जमा झालेली १२ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम कापडी पिशवीमध्ये कपाटात ठेवली होती. त्यानंतर कपाटासह केबीनही लॉक केली होती.
ऑफीसच्या खाली असलेल्या जिन्याचे चॅनेल गेट लावून त्याची चावी रात्रपाळीचे सुरक्षारक्षक रामभाऊ पाटील यांना दिली होती. दुसऱ्या शिफ्टचे रात्रपाळीचे कामगार कंपनीत काम करीत होते. त्यांना सूचना देवून दोघे घरी निघून गेले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्याने केबिन तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे ड्रॉवर तोडून रोकड चोरून नेली.
चोरटा सीसीटीव्हीत कैद -
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता ऑफीस बॉय मिनास सय्यद याने फोनवरून कंपनीत चोरी झाल्याबाबत भरत यांना कळविले. भरत, सागर व विक्की हे कंपनीत आले. चोरट्याने ऑफीसमधील ड्राॅवरचे लॉक तोडलेले होते. केबीनमधील खुर्च्या अस्ताव्यस्त फेकलेल्या होत्या. कपाटात पैशांची पांढरी पिशवी दिसली नाही. टेबलवर हमाली कामासाठी लागणारी हूक, मोठा स्क्रू डायव्हर पडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले.
१४ क्रमांकाच्या कॅमेऱ्यामध्ये कंपनीतील ऑपरेटर भालचंद्र यादव व हेल्पर सचिन शर्मा येताना दिसत होते. मध्यरात्री २ वाजून २७ मिनिटांनी परत जाताना दिसले. त्यानंतर २ वाजून ४१ मिनिटांनी सहा फूट उंचीचा तोडांवर मास्क लावलेला अनोळखी व्यक्ती दिसला. त्याच्या हातात स्क्रू डायव्हर होते. केबीनचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्याकडून दरवाजा न उघडल्याने पॅन्ट्रीमधून विक्की यांच्या केबीनमध्ये उडी मारली. त्याच्याजवळ हमालीची हुकही दिसत होती. तो चोरटा ३.३१ वाजता पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन बाहेर जाताना दिसला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.