जळगाव - शहरातील मोहाडी रस्त्यावरील दौलतनगरात राहणाऱ्या एका स्टील व्यावसायिकाच्या घरी आज पहाटे तीनच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून व्यावसायिकाच्या घरातून 3 लाखांची रोकड तसेच 20 लाख रुपयांचे सोने व चांदीचे दागिने, असा 23 लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पिंटू बंडू इटकरे (वय 35) यांच्या राहत्या घरी ही घटना घडली आहे.
शहरातील मोहाडी रोडवर असणार्या दौलत नगरात पिंटू इटकरे हे लोखंडी सामान विक्री करणारे व्यापारी पत्नी आणि मुलीसह राहतात. त्यांच्या बंगल्याच्या तळमजल्यावर पार्कींग असून वर दोन मजले आहेत. आज सकाळी सव्वा तीन वाजेच्या सुमारास हे इटकरे कुटुंबीय गाढ झोपेत असताना सहा दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी आपली ओळख पटू नये म्हणून चेहरा झाकला होता. त्यांनी इटकरेंची पत्नी मनिषा यांना तोंड दाबून उठवले. तर पिंटू इटकरे यांना चाकू लावून घरात काय जे असेल ते काढून देण्यासाठी धमकावलं. घाबरलेल्या इटकरे यांनी घरातील तीन लाख रोकड आणि 20 लाखांचे दागिने दरोडेखोरांना काढून दिले. मुद्देमाल घेतल्यानंतर इटकरे यांना धमकावत हे सहाही दरोडेखोरांनी पळ काढला.
दरोडेखोरांनी घातले होते बुरखे -
या सहा दरोडेखोरांपैकी पाच जणांनी संपूर्ण चेहरा झाकला जाईल, असा बुरखा घातला होता. तर सहाव्याने तोंडावर विदूषकाचा मास्क लावला होता. सव्वातीन ते चार वाजेपर्यंत ते इटकरे यांच्या घरात होते. येथून पलायन करताना त्यांनी बंगल्याच्या तळमजल्यावर लावलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून घेतला. तर इटकरे पती-पत्नी या दोघांचा मोबाईल घेऊन तो खाली फेकून दिला.
पोलिसात धाव -
या घटनेनंतर भेदरलेल्या इटकरे दाम्पत्याने दिवस उजडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत, तक्रार दाखल केली. यानंतर रामानंदनगर पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. इटकरे दाम्पत्याचे जाबजबाब घेण्यात आले असून, पोलीस गुन्हा दाखल करत आहेत.