जळगाव - शहरात गेल्या दोन वर्षांपासून अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरु आहे. यामुळे शहरातील नवीन रस्त्यांच्या कामाला ‘ब्रेक’ लागला आहे. या योजनांच्या खोदकामामुळे शहरातील एकूण ६४५ किमी रस्त्यांपैकी ५७० किमीचे रस्ते खोदण्यात आले आहेत. म्हणजे शहरातील ९० टक्के रस्त्यांची दुर्दशा झाली असून, गेल्या दोन वर्षांपासून खड्डेमय रस्त्यावरूनच जळगावकरांना प्रवास करावा लागत आहे.
अमृत पाणी पुरवठा योजना शहरासाठी मंजूर झाल्यानंतर शहरात नवीन रस्त्यांचे काम हाती घेण्यास शासनाने बंदी घातली होती. त्यामुळे जळगावकरांना दोन वर्ष योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत खराब रस्त्यामधूनच मार्ग काढावा लागणार हे निश्चित झाले होते. मात्र, प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी हा शासन निर्णय एवढा मनावर घेतला की, रस्त्यांची साधी दुरुस्तीही त्यांना करता आलेली नाही. काही ठिकाणी दुरुस्ती झाली. मात्र, तीन महिन्यांच्या काळातच मनपाच्या कामाचे पितळ उघडे पडले. दरम्यान, आता कुठे दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असली तरी हे काम थातुर-मातुर पध्दतीनेच होत आहे.
दुरुस्तीसाठी ३०० कोटींचे अंदाजपत्रक-अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम मार्चपर्यंत संपणार आहे. तर भुयारी गटार योजनेच्या कामाची मुदत जुलै महिन्यापर्यंत आहे. भुयारी गटार योजनेच्या कामाची गती पाहिल्यास हे काम मुदतीपूर्वी होण्याची शक्यता असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली होती. या दोन्ही योजनांचे काम अंदाजे ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शहरातील खोदलेल्या रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सुमारे ३०० कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. ३०० कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त न झाल्यास मनपाकडे इतका निधी निर्माण होणे कठीण आहे. त्यामुळे अमृतची कामे पूर्ण झाली तरी निधीअभावी कामे होणे कठीणच आहे.
शासनाकडून निधी मिळणे कठीण-ज्या शहरांमध्ये अमृतची कामे झाली आहेत किंवा सुरु आहेत; त्या शहरातील रस्त्यांची कामे अमृत योजना पूर्ण झाल्यावरच करण्याचा सूचना शासनाने दिल्या होत्या. तसेच शासन आदेशाप्रमाणे योजनेनंतर रस्त्यांच्या कामासाठीचा निधी शासनाकडून देण्यात येणार होता. मात्र, ४ मे च्या शासन निर्णयानुसार कोरोनाच्या महामारीमुळे नवीन कामांना शासनाने ‘ब्रेक’ लावला आहे. शासनाने मनपाला जाहीर झालेल्या १०० कोटींच्या निधीला स्थगिती दिली आहे. अशा परिस्थितीत मनपाला नवीन रस्त्यांसाठी लागणारा ३०० कोटींचा निधी मनपा उभारणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मनपा फंडातून मनपाने आधीच ४६ कोटींच्या रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. त्यासाठीही मनपाकडून निधी उपलब्ध नाही.
रस्ते दुरुस्तीसाठी शासनच निधी देणार-अमृतची कामे सुरु असलेल्या शहरात खोदकामामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीसाठी शासनच निधी देणार आहे. त्यामुळे भविष्यात रस्त्यांचा प्रश्न भेडसावणार नाही. अमृतच्या कामामुळे नक्कीच रस्त्यांची दुरवस्था झाली असली, तरी त्याला पर्याय नव्हता. मात्र, योजना पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांचे काम हेच मुख्य अजेंड्यावर राहणार आहे, अशी माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.
-भुयारी गटार योजनेतंर्गत होणारे खोदकाम - १७० किमी
-पाणीपुरवठा योजनेतंर्गत झालेले खोदकाम - ६२४ किमी
-शहरातील रस्ते - ६४५ किमी
-दोन्ही योजनेतंर्गत तुटलेले रस्ते - ५७० किमी
-योजनेचे काम नसतानाही रस्त्यांची दुर्दशा - ९० किमी (अंदाजे)
हेही वाचा- 'भारतात बनवलेली कोरोनावरील लस नव्या विषाणूवरही प्रभावी'