जळगाव -शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता असलेल्या रिंगरोडच्या दुरुस्तीच्या कामाला महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर नारळ फोडून दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रमुख रस्त्याची दुरवस्था-
शहराचा मुख्य मध्यवर्ती आणि प्रमुख वर्दळीचा रस्ता असलेल्या रिंगरोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरुन वाहन चालवावे लागत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे कित्येकदा अपघातांना निमंत्रण मिळाले होते. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी विनंती परिसरातील व्यापारी वर्ग तसेच वाहनचालकांकडून करण्यात येत होती. आता रस्ते दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी कामाच्या शुभारंभप्रसंगी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका सीमा भोळे,आदींसह इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.