जळगाव - जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रात राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली ही जागा अखेर काँग्रेसला सोडण्यात आली आहे. येत्या २ दिवसात काँग्रेस या जागेचा उमेदवार जाहीर करणार आहे. शुक्रवारी दुपारी काँग्रेसच्यावतीने पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
रावेरची जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्याने या जागेवर काँग्रेसकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. उल्हास पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांची लढत माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांच्याशी होणार आहे.
मुंबईत पार पडलेल्या बैठकीत रावेरची जागा काँग्रेसला देण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती जाहीर केली. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून रावेरच्या जागेबाबत माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. काँग्रेसकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार नीळकंठ फालक, जगदीश पाटील, मुनावर शेख तसेच प्रा. हेमंत चौधरी इच्छुक आहेत. परंतु डॉ. उल्हास पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.