जळगाव - आम्हाला आणि जनतेला जो निकाल अपेक्षित होता; तोच निकाल समोर आला आहे. महायुतीकडून, खासकरून पक्षाकडून जेव्हा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून रावेर लोकसभा मतदारसंघातील जनतेत एक उत्साह होता. हा फक्त माझा विजय नसून महायुतीचे नेते व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा खऱ्या अर्थाने विजय आहे, अशी प्रतिक्रिया रावेरच्या नवनिर्वाचित खासदार तथा माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसेंनी निकालानंतर दिली आहे.
रक्षा खडसे पुढे म्हणाल्या, रावेर मतदारसंघातील जनतेची इच्छा होती की मी पुन्हा एकदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे. आता जो निकाल समोर आला आहे, त्या निकालावरून जनतेची इच्छा पूर्ण झाली आहे. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. जवळपास नववी टर्म याठिकाणी सातत्याने भाजपचा खासदार निवडून येत आहे. या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर याठिकाणी एकनाथ खडसे यांनी नेतृत्व केले आहे. आताही ते सक्रिय होते. त्यांचे पूर्ण लक्ष मतदारसंघाकडे होते. त्याचप्रमाणे भाजप-सेना युतीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्याने आज माझा विजय झाला आहे. त्यामुळे विजयाचे श्रेय सर्वांना जाते. एकनाथ खडसे यांची सून म्हणून मतदारसंघातील जनतेच्या त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत; साहजिकच त्या माझ्याकडूनही आहेत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे, असेही रक्षा खडसे म्हणाल्या
देशभरात आज उत्साहाचे वातावरण आहे. देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार असून पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. देशातील सर्वसामान्य नागरिकांनी जे विकासाचे स्वप्न पाहिले आहे, ते निश्चितच पूर्ण होईल, असा मला आत्मविश्वास आहे, असेही रक्षा खडसेंनी यावेळी सांगितले.