जळगाव - रावेरच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी गुरुवारी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. रक्षा या माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा असून त्याच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी गुरूवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भाजपकडून रक्षा खडसे यांनी तर राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर यांनी आपले अर्ज दाखल केले. खडसेंसोबत अर्ज दाखल करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार स्मिता वाघ उपस्थित होते. दरम्यान, शिवसेनेचे पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांचे निधन झाल्याने भाजपने उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन तसेच जाहीर कार्यक्रम घेणे टाळले.
स्मिता वाघ यांचे वेट अॅण्ड वॉच
उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी भाजपकडून जळगाव लोकसभेसाठी आमदार स्मिता वाघ तर रावेरसाठी खासदार रक्षा खडसे अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, गुरूवारी फक्त खडसे यांनी अर्ज दाखल केला. आज स्मिता वाघ यांनी अर्ज भरला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. पक्षाने ऐनवेळी तिकीट कापल्याने नाराज झालेले जळगावचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांनी २ दिवसांपूर्वी समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचा इशारा दिल्याने जळगावच्या उमेदवारीविषयी फेरविचार होणार का, अशीही चर्चा वाघ यांनी अर्ज न भरल्याने सुरू आहे.