जळगाव- गेल्या दोन दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. कधी रिमझिम तर कधी मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे आषाढ मासातच नागरिकांना श्रावणाची अनुभूती येत आहे.
यावर्षी जून महिना संपत आला तरी पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे सर्वच चिंतातूर झाले होते. मात्र, २५ जूननंतर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला यावल, रावेर, भुसावळ, जामनेर, जळगाव या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. मात्र, इतर तालुक्यात पावसाने दडी मारली. मात्र, गेल्या आठवडाभरात संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. चांगला पाऊस झाल्याने खरिपाची पेरणीदेखील अंतिम टप्प्यात आली आहे. आजमितीस जिल्ह्यातील ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या दमदार पावसाची आकडेवारी लक्षात घेतली, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ जुलैपर्यंत १३५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी ६७ टक्के इतकी आहे.
जळगाव शहरात शनिवारी सूर्यदर्शनही झाले नव्हते. दिवसभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. रविवारी देखील सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. दुपारी १२ वाजेपर्यंत चांगला पाऊस झाला. त्यानंतर थोडावेळ उघडीप मिळाली. त्यानंतर दीड वाजेपासून पुन्हा जोरदार पाऊस झाला. यामुळे आषाढ महिन्यातच श्रावणातील पावसाचा अनुभव शहरवासीयांनी घेतला आहे.