जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी सकाळी गोवा एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला. सुदैवाने रेल्वेरूळ तुटल्याचे वेळीच लक्षात आल्याने गोवा एक्सप्रेस थांबविण्यात आली. त्यामुळे अपघात घडला नाही. या घटनेनंतर हजारो प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हेही वाचा- शबरीमला प्रकरणी पुनर्याचिका आता संविधानिक पीठाकडे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
दिल्ली येथील हजरत निजामुद्दीनकडून वास्को (गोवा) कडे जाणारी १२७८० ही गोवा एक्सप्रेस गुरुवारी सकाळी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आली होती. ही एक्सप्रेस चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून पुढे जात होती. काही अंतरावर एका ठिकाणी रेल्वे रुळ तुटला असल्याचे शेजारी उभ्या असलेल्या मालगाडीच्या चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी सतर्कता दाखवित या घटनेविषयी स्थानक मास्तरला कळविले. त्यानंतर गोवा एक्सप्रेस जागीच रोखण्यात आली. मात्र, तोपर्यंत रेल्वेचे चार साधारण व चार आरक्षित डबे या तुटलेल्या रुळाच्या भागावरून पुढे गेलेले होते. मात्र, यात सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. या घटनेनंतर रुळाची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. तुटलेल्या रेल्वे रुळाची दुरुस्ती केल्यानंतर गोवा एक्सप्रेस पुढे मार्गस्थ झाली. दरम्यान, रेल्वेरूळ तुटल्याचे लक्षात आले नसते. किंवा गोवा एक्सप्रेसचा वेग अधिक राहिला असता तर मोठा अपघात घडला असता.