जळगाव - भाजपचे आमदार गिरीश महाजन ( BJP MLA Girish Mahajan ) संशयित असलेल्या कोथरुड पोलीस ठाण्यात ( Kothrud Police Station ) दाखल गुन्ह्यात दोन दिवसांपासून पुणे पोलिसांचे पथक जळगावात ( Pune Police in Jalgaon ) कसून चौकशी करत आहे. पथकाने जळगावात पाच जणांची चौकशी करत गाडीभर कागदपत्रे तसेच संगणक व इतर साहित्य जप्त केले आहे. जप्त गाडीभर मुद्देमाल घेवून वाहन पुण्याकडे रवाना ( Police left for Pune After taking Documents ) झाले. गाडीभर कागदपत्रांमध्ये नेमके काय आहे, हे गुलदस्त्यात असून त्याच्या चौकशीनंतर या गुन्ह्यात आमदार गिरीश महाजन यांसह आणखी काही राजकीय पुढारी यात अडकणार का, हे स्पष्ट होणार आहे.
मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादप्रकरणी अॅड. विजय भास्करराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल आमदार गिरीश महाजन, निलेश भोईटे यांच्यासह 29 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात चौकशीसाठी पुणे पोलिसांचे 50 जणांचे पथक जळगावात दोन दिवसांपासून ठाण मांडून होते. जळगावात पाच संशयितांकडे दोन दिवस कसून चौकशी करण्यात आली. सोमवारी (दि. 10 जानेवारी) महापालिकेत तसेच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चौकशी करत काही कागदपत्रे हस्तगत केली आहे. गाडीभर कागदपत्रांमध्ये नेमके काय दडलेले आहे. हा चौकशीचा भाग असल्याने अधिकार्यांनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.