जळगाव - भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जीवनावरील 'जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे' या पुस्तकाचे आज प्रकाशन होणार आहे. मुक्ताईनगर येथे असलेल्या खडसेंच्या फार्महाऊसवर आयोजित ऑनलाईन सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. भुसावळ येथील भाजपाचे पदाधिकारी प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. दरम्यान, खडसेंनी आपल्या वाढदिवसापासून पुन्हा एकदा पक्षविरोधी भूमिका घेतली असून, ते उघडपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. आज होणाऱ्या कार्यक्रमात ते काय बोलतात, याची उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपाने खडसेंना तिकीट नाकारून तिकीट वाटपाच्या अंतिम टप्प्यात कन्या अॅड. रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली. मात्र, अॅड. खडसेंचा निवडणुकीत पराभव झाला होता. तेव्हापासून खडसे पक्षावर नाराज आहेत. फडणवीस यांनीच तिकीट नाकारले, मुलीच्या पराभवासाठी त्यांनीच इतर मंत्री, नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले, असे आरोप खडसेंनी यापूर्वीच केलेले आहेत. पक्षाकडे याबाबतचे पुरावे देऊनही संबंधितांवर कारवाई केली जात नाही. माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करणाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षात आहे का? असा खडसेंचा सवाल आहे. दरम्यान, आज होणाऱ्या कार्यक्रमात खडसे या साऱ्या गोष्टींवर पुन्हा एकदा प्रकाशझोत टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी लिहिलेल्या 'जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे' या पुस्तकात एकनाथ खडसे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. खडसेंच्या राजकीय जीवनातील चढउतार, त्यांच्यावर झालेले आरोप-प्रत्यारोप याचा आढावा पुस्तकात प्रा. डॉ. नेवेंनी घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक जळगाव जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या पुस्तकाच्या प्रकाशनाची प्रतीक्षा होती, ती आज संपणार आहे.
हेही वाचा - पीक विमा कंपन्यांची मुजोरी थांबवा; आमदार चंद्रकांत पाटलांचे कृषी मंत्र्यांना साकडे
हेही वाचा - जळगावच्या सुपुत्राचा सातासमुद्रापार झेंडा; ऑस्ट्रेलियाच्या निवडणूक आयोगात प्रकल्प व्यवस्थापक प्रमुखपदी निवड